ldest Meteor Crater Discovery | सर्वात जुने ‘उल्कापात विवर’ अपेक्षेपेक्षा ४७ कोटी वर्षे तरुण!

 ldest Meteor Crater Discovery |
ldest Meteor Crater Discovery | सर्वात जुने ‘उल्कापात विवर’ अपेक्षेपेक्षा ४७ कोटी वर्षे तरुण!
Published on
Updated on

सिडनी : पृथ्वीवरील सर्वात जुने मानले जाणारे उल्कापात विवर सुमारे ३ अब्ज (३ बिलियन) वर्षांपूर्वी तयार झाले असावे, असा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वी केलेल्या दाव्यापेक्षा हा काळ तब्बल ४७ कोटी वर्षे नंतरचा (म्हणजेच हा विवर आधीच्या अंदाजापेक्षा ४७ कोटी वर्षे तरुण) आहे.

पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ‘पिल्बारा’ भागात हे विवर स्थित असून त्याला ‘नॉर्थ पोल डोम विवर’ म्हणून ओळखले जाते. या भागात पृथ्वीवरील सर्वात जुने खडक आढळतात. विशेष म्हणजे, वयाचा नवा अंदाज समोर आल्यानंतरही या विवराचा ‘जगातील सर्वात जुना उल्कापात विवर’ हा विक्रम कायम आहे. याने ऑस्ट्रेलियातीलच दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जुन्या ‘याराबुब्बा’ विवराला जवळपास ८० कोटी वर्षांनी मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीच्या ‘स्कूल ऑफ अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्सेस’चे प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख लेखक क्रिस क्रिकलँड यांनी सांगितले की, ‘‘हे ठिकाण एक प्राचीन उल्कापात विवर आहे हे आधीच स्पष्ट झाले होते; परंतु त्याचे अचूक वय निश्चित नव्हते.

या उल्कापाताने मागे एक ‘मिनरल क्लॉक’ (खनिजांचे घड्याळ) सोडले होते. उल्कापाताच्या आघातामुळे खराब झालेल्या खडकांमध्ये जे नवीन खनिज तयार झाले किंवा बदलले, त्यांचे वय मोजून आम्ही या ऐतिहासिक घटनेची अचूक वेळ शोधून काढली आहे.’’ गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात क्रिकलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दावा केला होता की, ‘नॉर्थ पोल डोम विवर’ ३.४७ अब्ज वर्षे जुना असल्याचे त्यांच्याकडे ‘स्पष्ट पुरावे’ आहेत. उल्कापाताच्या तीव्र लहरींमुळे खडकांवर तयार होणाऱ्या शंकूच्या आकाराच्या ‘शॅटर कोन्स’ या खडकांच्या तुकड्यांच्या विश्लेषणावर हा दावा आधारित होता. परंतु, त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या जर्नलमधील एका दुसऱ्या संशोधनाने हा जुना दावा ‘अचूक नाही’ असे म्हणत फेटाळून लावला आणि हा उल्कापात २.७ अब्ज वर्षांपूर्वीपेक्षा आधी झालेला असू शकत नाही, असा युक्तिवाद केला.

या नव्या अभ्यासासाठी क्रिकलँड आणि त्यांच्या टीमने प्रगत ‘मिनरल डेटिंग’ (खनिज वय निर्धारण) तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनी ‘शॅटर कोन्स’मधील झिरकॉन, अपाटाईट, कॅल्साईट आणि मस्कोव्हाईट या खनिजांच्या वयाचा अंदाज लावला. संशोधकांनी शॅटर-कोन असलेल्या खडकांचे दोन नमुने आणि एका ‘शॉक्ड क्वार्टज्‌ व्हेन’चे विश्लेषण केले. जेव्हा अत्यंत गरम आणि खनिजांनी समृद्ध असलेले पाणी खडकांच्या भेगांमधून वाहते, तेव्हा अशा प्रकारच्या क्वार्टज्‌च्या रेषा तयार होतात. या सर्वांच्या अभ्यासातून अखेर या विवराचे वय ३ अब्ज वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news