

मॉस्को ः डोंगरांप्रमाणेच पृथ्वीवरील काही सरोवरे देखील लाखो वर्षे जुनी असू शकतात. पृथ्वीवर केवळ 20 अतिशय प्राचीन सरोवरे आहेत. पण त्यापैकी सर्वात जुने कोणते आहे? पृथ्वीवरील सर्वात जुन्या सरोवराचा मान रशियातील सैबेरियाच्या आग्नेय भागातील बैकाल सरोवराला मिळतो. मिनेसोटा विद्यापीठातील जैविक जलशास्त्राचे प्राध्यापक टेड ओझर्स्की यांच्या मते, हे विशाल गोड्या पाण्याचे सरोवर तब्बल 25 दशलक्ष वर्षे जुने आहे. तुलनेत, उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्स (महासरोवरे) केवळ 20,000 वर्षांपूर्वी निर्माण झाली. पृथ्वीवरील दुसर्या क्रमांकाचे सर्वात जुने सरोवर म्हणजे इस्सिक-कुल सरोवर (किरगिझस्तान), जे सुमारे 20 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाले.
बैकाल सरोवराचे क्षेत्रफळ 31,700 चौ. कि.मी. आहे, त्यामुळे ते जगातील सप्तम मोठे सरोवर मानले जाते. केवळ सर्वात जुनेच नाही, तर हे सर्वात खोल सरोवरही आहे, ज्याची खोली अंदाजे 1.6 कि.मी. आहे. मात्र, खर्या अर्थाने त्याच्या तळाशी 5 ते 7 कि.मी. जाडीचे गाळाचे थर असल्यामुळे त्याचे बेसिन अधिक खोल आहे. शास्त्रज्ञ या गाळाच्या थरांचा अभ्यास करून सरोवराचे वय ठरवतात. हे आइसोटोप डेटिंग तंत्राने केले जाते, ज्यामध्ये सीझियम, शिसे आणि कार्बन या रेडिओऍक्टिव्ह घटकांचे प्रमाण मोजले जाते. यामुळे सरोवराच्या वेगवेगळ्या स्तरांचे वय आणि गाळ कसा साठतो, याचा अंदाज लावता येतो. सामान्यतः सरोवरे हिमनद्या वितळून तयार होतात आणि फार काळ टिकत नाहीत. मात्र, बैकाल सरोवर हे ‘रिफ्ट लेक’ आहे. रिफ्ट लेक्स तेव्हा तयार होतात जेव्हा दोन खंडीय प्लेटस् एकमेकांपासून दूर सरकतात आणि त्यामध्ये मोठा दरीसद़ृश भाग तयार होतो. प्लेटस् सतत हलत असल्याने हा दरीचा भाग अधिक खोल होत जातो आणि त्यामुळे असे सरोवरे लाखो वर्षांपर्यंत टिकू शकतात. बैकाल सरोवर हे केवळ पृथ्वीवरील सर्वात जुने आणि खोल सरोवर नाही, तर एक अद्वितीय भौगोलिक आणि जैविक खजिना आहे. त्याच्या अभ्यासामुळे पृथ्वीवरील प्राचीन जलसंस्थांच्या टिकाऊपणाचे रहस्य उलगडण्यास मदत होते.