55 million year old organism | 55 कोटी वर्षे जुने जगातील सर्वात पहिले ‘जटिल’ जीव

55 million year old organism |
55 million year old organism | 55 कोटी वर्षे जुने जगातील सर्वात पहिले ‘जटिल’ जीव
Published on
Updated on

बीजिंग : लहान ‘हात’ असलेले चषकाच्या आकाराचे जेलीफिशचे नातेवाईक, सॉसेजसारखा दिसणारा एक गुबगुबीत आणि बिनपायांचा प्राणी आणि समुद्राच्या तळाशी स्थिर राहण्यासाठी सपाट चकतीसारखे अवयव असलेले लांब जंतासारखे कीटक... चीनच्या नैऋत्य भागात सापडलेल्या अतिशय दुर्मीळ आणि स्पष्ट जीवाश्मांनी पृथ्वीच्या इतिहासातील ‘एडियाकारन’ (Ediacaran - 63.5 कोटी ते 54.2 कोटी वर्षांपूर्वीचा काळ) युगाची अनेक रहस्ये उलगडली आहेत. या शोधामुळे पाठीचा कणा असलेल्या सर्व आधुनिक प्राण्यांचे पूर्वज मानले जाणारे गुंतागुंतीचे आणि जटिल जीव, आपल्या अंदाजापेक्षा लाखो वर्षे आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात होते, हे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत वैज्ञानिक जगतात अशी धारणा होती की, पृथ्वीवर जटिल प्राण्यांची उत्क्रांती ‘कॅम्ब्रियन’ (Cambrian - 54.2 कोटी ते 48.8 कोटी वर्षांपूर्वीचा काळ) युगात झाली. या काळाला ‘कॅम्ब्रियन एक्स्प्लोजन’ म्हटले जाते. कारण, याच काळात वेगवेगळ्या विचित्र शरीररचना असलेल्या प्राण्यांचा उदय झाला, ज्यातून पुढे आधुनिक काळातील पृष्ठवंशीय, कवचधारी आणि गोगलगायसारखे मऊ शरीराचे प्राणी निर्माण झाले. एडियाकारन काळातील जीवाश्मांमध्ये वैविध्य नसल्यामुळे, शास्त्रज्ञांचा असा कयास होता की, त्या काळात जटिल जीव अस्तित्वातच नव्हते. मात्र, चीनमधील या नव्या शोधामुळे हा इतिहास बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चीनमध्ये सापडलेले हे हाडे नसलेले मऊ जीव ‘बायोफिल्म’च्या स्वरूपात जतन झाले आहेत. हे प्राणी गाळाखाली वेगाने गाडले गेल्याने आणि खडकांच्या थरांमध्ये दाबले गेल्याने, त्यांच्या सेंद्रिय ऊतींचे अगदी स्पष्ट त्रिमितीय ठसे उमटले आहेत. यामध्ये प्राण्यांची संपूर्ण शरीरे सुरक्षित राहिली असून, सहसा नष्ट होणारे त्यांचे अन्न खाण्याचे अवयव, नाजूक हात-पाय आणि अंतर्गत अवयवांचे अंशही स्पष्टपणे दिसत आहेत. ‘सायन्स’ (Science) या नामांकित जर्नलमध्ये गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाला असे आढळून आले आहे की, जटिल प्राणी जीवनाचा उदय 55.4 कोटी ते 53.9 कोटी वर्षांपूर्वी झाला होता. म्हणजेच कॅम्ब्रियन युगाच्या किमान 40 लाख वर्षे आधी हे जीव पृथ्वीवर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news