

न्यूयॉर्क/जकार्ता : मानवी संस्कृती, कला आणि कल्पकता यांचा उगम युरोपमध्ये झाला, हा अनेक दशकांपासूनचा जागतिक समज आता मोडीत निघाला आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर शास्त्रज्ञांना मानवी हातांचे असे काही ठसे सापडले आहेत, जे तब्बल 67,800 वर्षे जुने आहेत. हे ठसे म्हणजेच रॉक आर्ट (गुहाचित्र) आतापर्यंतची जगातील सर्वात जुनी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या एका पथकाने सुलावेसी बेटावरील मुना परिसरात एका अज्ञात गुहेचा शोध लावला. या गुहेच्या भिंतीवर त्यांना हातांचे ठसे आढळले. हे ठसे बनवण्यासाठी आदिमानवाने भिंतीवर हात ठेवून त्यावर नैसर्गिक रंग फुंकले होते, ज्यामुळे हाताची बाह्यरेखा तयार झाली. काही हातांच्या बोटांची टोके टोकदार करण्यासाठी त्यात बदल करण्यात आले होते. ही शैली केवळ सुलावेसीमध्येच पाहायला मिळते.
या गुहाचित्रांचे वय मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. गुहेच्या भिंतीवर या चित्रांच्या वर कॅल्शियम कार्बोनेटचे थर साचले होते. लेसर अबलेशन युरेनियम-सीरिज या तंत्राद्वारे या थरांचे विश्लेषण करण्यात आले, ज्यातून हे स्पष्ट झाले की, ही गुहाचित्रे किमान 67,800 वर्षे जुनी आहेत. या शोधापूर्वी जगातील सर्वात जुनी कलाकृती स्पेनमधील गुहेत असल्याचे मानले जात होते (वय सुमारे 66,700 वर्षे). मात्र, इंडोनेशियातील हा शोध त्यापेक्षाही 1,100 वर्षांनी जुना आहे. यामुळे कलेचा उगम आशियात झाल्याचे आता सिद्ध होत आहे.
कोणी बनवली ही गुहाचित्रे?
इंडोनेशियातील गुहेत सापडलेले हे ठसे नेमके कोणाचे आहेत, यावर अद्याप संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञांचे दोन अंदाज आहेत. त्यातील पहिल्या अंदाजानुसार त्याकाळी डेनिसोव्हन्स नामक मानवाचा एक प्राचीन गट होता जो या भागात वास्तव्यास होता, त्यांचे ठसे असावेत. दुसर्या अंदाजानुसार आफ्रिकेतून बाहेर पडलेले होमो सेपियन्स या आधुनिक मानवाचे हे ठसे असण्याचीही शक्यता आहे. होमो सेपियन्स हे त्याकाळी आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियाच्या दिशेने स्थलांतर करत होते.
ग्रिफिथ युनिव्हर्सिटीचे संशोधक मॅक्सिम ऑबर्ट यांच्या मते, हा शोध केवळ चित्रांचा नसून मानवी सर्जनशीलतेच्या प्रवासाचा पुरावा आहे. मानवाने केवळ जगण्यासाठी शिकार केली नाही, तर हजारो वर्षांपूर्वी स्वतःला व्यक्त करण्यासाठी कलेचा आधार घेतला होता, हे यातून स्पष्ट होते.