Oldest cave painting | इंडोनेशियात सापडले जगातले सर्वात जुने गुहाचित्र

67,800 वर्षांपूर्वीच्या मानवी कलेचा शोध
Oldest cave painting |
Oldest cave painting | इंडोनेशियात सापडले जगातले सर्वात जुने गुहाचित्र
Published on
Updated on

जकार्ता : इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर तब्बल 67,800 वर्षांपूर्वीचे प्राचीन गुहाचित्र सापडले आहे. हा शोध जगातील आजवरचा सर्वात जुना गुहाचित्राचा पुरावा मानला जात असून, याने युरोपमधील ‘निएंडरथल’ मानवाने बनवलेल्या चित्रांचा जुना जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. ‘नेचर’ या जगप्रसिद्ध विज्ञान नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

यापूर्वी इंडोनेशियातील नैॠत्य सुलावेसी भागातील मारोस-पांगकेप आणि बोर्निओमधील पूर्व कालीमंतन भागात प्लाइस्टोसीन युगातील मानवी हातांचे ठसे आणि प्राण्यांची चित्रे सापडली होती. मात्र, आता सुलावेसीच्या आग्नेय भागात असलेल्या मुना बेटावरील ‘लियांग मेतांदुनो’ गुहेत याहूनही प्राचीन कलेचा खजिना हाती लागला आहे. गुहेतील हाताच्या ठशावर निसर्गतः जमा झालेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या थराची ‘लेझर-अ‍ॅब्लेशन युरेनियम-सिरीज’ या आधुनिक पद्धतीने तपासणी करण्यात आली.

या तपासणीत हा थर 71,600 वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ त्या थराच्या खाली असलेले मूळ गुहाचित्र किमान 67,800 वर्षे जुने आहे. हे नवीन चित्र सुलावेसीतीलच मारोस-पांगकेप येथे यापूर्वी सापडलेल्या गुहाचित्रापेक्षा 16,600 वर्षांनी जास्त जुने आहे. याआधी स्पेनमध्ये नेअंडरथल मानवाने बनवलेले गुहाचित्र (किमान 66,700 वर्षे जुने) हे जगातले सर्वात जुने चित्र मानले जात होते. आता सुलावेसीतील चित्र त्यापेक्षा 1,100 वर्षांनी जुने असल्याचे सिद्ध झाले आहे.

सुमारे 65,000 वर्षांपूर्वी आदिमानवाने ‘साहुल’ (प्राचीन महाद्वीप ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीचा समावेश होता) कडे जाताना बोर्निओ आणि पापुआ दरम्यान सागरी प्रवास केला होता, या सिद्धांताला या शोधामुळे बळकटी मिळाली आहे. सुलावेसी हा आशिया आणि ऑस्ट्रेलिया-न्यू गिनी यांना वेगळे करणार्‍या सागरी क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. या भागात आग्नेय सुलावेसीतील गुहाचित्रांचा अभ्यास प्रदीर्घ काळापासून अपूर्ण होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news