oldest barred spiral galaxy | 11.5 अब्ज वर्षांपूर्वीची सर्वात जुनी ‘बार्ड स्पायरल’ आकाशगंगा
वॉशिंग्टन : पुढील पिढीच्या प्रगत उपकरणांमुळे खगोलशास्त्र आणि कॉस्मॉलॉजीच्या सीमा विस्तारत आहेत. अलीकडेच वैज्ञानिकांनी ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील काही आकाशगंगांचा शोध लावला असून, यामुळे आकाशगंगांच्या निर्मिती आणि उत्क्रांतीच्या सिद्धांतांना नवीन दिशा मिळाली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ पिटस्बर्गच्या नेतृत्वाखालील खगोलशास्त्रज्ञांच्या एका गटाने आतापर्यंतची सर्वात जुनी ‘बार्ड स्पायरल’ आकाशगंगा शोधून काढली आहे. या शोधामुळे विश्वात तार्यांच्या या विशिष्ट रचनेची निर्मिती नेमकी कधी झाली, याचा कालखंड निश्चित करण्यात मदत होणार आहे. पिटस्बर्ग विद्यापीठातील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे विद्यार्थी डॅनियल इवानोव्ह यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने उजडचजड-74706 नावाची ही दीर्घिका शोधण्यात आली. त्यानंतर, केक-1 टेलिस्कोपवरील ‘मॉसफायर’ उपकरणाद्वारे मिळालेल्या पुष्टीनुसार, ही आकाशगंगा 11.5 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष 8 जानेवारी 2026 रोजी फिनिक्स, अॅरिझोना येथे अमेरिकन अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या 247 व्या बैठकीत सादर करण्यात आले. हबल सिक्वेन्सच्या नियमानुसार, आकाशगंगांचे त्यांच्या आकारानुसार लंबवर्तुळाकार, सर्पिलाकार आणि लेन्टिक्युलर असे गट केले जातात.
सामान्यतः आकाशगंगांची सुरुवात अनियमित चकतीसारखी होते आणि कालांतराने त्यांच्या मध्यभागातून बाहेर येणारे सर्पिलाकार हात तयार होतात. ‘बार्ड स्पायरल’ म्हणजे काय? आपल्या सूर्यमालेची ‘मिल्की वे’ ही आकाशगंगा देखील एक ‘बार्ड स्पायरल’ आहे. यामध्ये केंद्रातून तार्यांची एक सरळ रेषेसारखी रचना गेलेली असते. ही रचना बाहेरील वायू केंद्राकडे खेचण्याचे काम करते. यामुळे केंद्रातील ‘सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल’ला इंधन मिळते. तसेच, ही प्रक्रिया संपूर्ण आकाशगंगेतील तार्यांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते.

