

भुवनेश्वर : जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते, तेव्हा डोंगरही फोडता येतो, हे ओडिशातील शकुंतला चतर (35) या महिलेने सिद्ध करून दाखवले आहे. चंदका डंपदा वन्यजीव अभयारण्याजवळील एका छोट्या गावात राहणार्या शकुंतला यांनी सलग 60 दिवस मेहनत करून 40 फूट खोल विहीर खणली असून, त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
दोन वर्षांपूर्वीपर्यंत शकुंतला यांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत असे. अभयारण्याच्या घनदाट जंगलातून पाण्यासाठी त्यांना जावे लागे, जिथे जंगली हत्तींचा मोठा धोका होता. इतके कष्ट करूनही जे पाणी मिळायचे, ते पिण्यायोग्य नसायचे. गावातील विंधन विहिरीचे पाणीही दूषित असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर कंटाळून शकुंतला यांनी स्वतःच्या जमिनीवर विहीर खणण्याचा धाडसी निर्णय घेतला.
सरकारी शाळेत माध्यान्ह भोजन स्वयंपाकी म्हणून काम करणार्या शकुंतला यांनी कामावरून आल्यावर दररोज तीन ते चार तास खोदकाम सुरू केले. कधी पती लादुराम तर कधी शेजारी जगन्नाथ तिगुआ यांची मदत घेत त्यांनी हार न मानता 40 फुटांपर्यंत खोदकाम केले. त्यांच्या या चिकाटीला अखेर यश आले आणि विहिरीला स्वच्छ पाणी लागले.
उत्तम नियोजनाचा आदर्श
शकुंतला यांनी केवळ पाणीच मिळवले नाही, तर विहीर खणताना निघालेल्या मातीपासून 4000 विटा तयार केल्या. या विटांचा वापर करून त्यांनी आपल्या पडक्या घराची दुरुस्तीही करून घेतली. आज या विहिरीच्या पाण्यामुळे त्यांच्या कुटुंबासह शेजारच्या 4-5 घरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
शकुंतला यांच्या या जिद्दीची दखल घेत सरपंच विष्णू प्रसाद डेंगा यांनी त्यांचे कौतुक केले असून, त्यांच्यामुळे गावाला एक नवी ओळख मिळाल्याचे म्हटले आहे. ‘कष्टाने अशक्य गोष्टी शक्य होतात,’ असा संदेशच शकुंतला यांनी आपल्या कार्यातून दिला आहे.