

कोपेनहेगन : एका नव्या अभ्यासानुसार, पृथ्वीचे महासागर शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूपच वाईट स्थितीत असून, आम्लतेची पातळी इतकी वाढली आहे की, आपले समुद्र पाच वर्षांपूर्वीच ‘धोकादायक क्षेत्रात’ प्रवेशले असण्याची शक्यता आहे. मानवी औद्योगिक क्रिया, विशेषतः जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून बाहेर पडणार्या कार्बन डायऑक्साईडमुळे नकळतपणे महासागरांची आम्लता वाढत आहे. या सागरी आम्लीकरणाचा थेट फटका सागरी परिसंस्थेला बसत असून, निरोगी समुद्रांवर अवलंबून असलेल्या किनारी मानवी वस्त्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे.
पूर्वीच्या संशोधनातून असे सूचित झाले होते की, पृथ्वीचे महासागर आम्लीकरणाच्या बाबतीत एका विशिष्ट मर्यादेच्या किंवा ‘धोकादायक क्षेत्राच्या’ जवळ पोहोचत आहेत. परंतु, ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ या नियतकालिकात सोमवारी (9 जून) प्रसिद्ध झालेल्या ताज्या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले आहे की, आम्लीकरणाची प्रक्रिया पूर्वीच्या विचारांपेक्षा खूपच पुढे गेली असून, आपले महासागर 2020 मध्येच धोकादायक क्षेत्रात प्रवेशले असण्याची दाट शक्यता आहे. संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की, 2020 पर्यंत, आपल्या जागतिक महासागरांची सरासरी स्थिती सागरी आम्लीकरणाच्या सीमेच्या अनिश्चिततेच्या कक्षेत होती, त्यामुळे सुरक्षिततेची मर्यादा कदाचित आधीच ओलांडली गेली असावी.
या अभ्यासानुसार, पृष्ठभागापेक्षा खोल समुद्रातील पाण्याची स्थिती अधिक वेगाने बिघडत असल्याचेही दिसून येत आहे. या नवीन अभ्यासात सहभागी असलेल्या सागरी संशोधन संस्था ‘प्लिमथ मरीन लॅबोरेटरी’चे विज्ञान संचालक आणि उपमुख्य कार्यकारी स्टिव्ह विडीकॉम्ब यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सागरी आम्लीकरण हे केवळ पर्यावरणीय संकट नाही, तर ते सागरी परिसंस्था आणि किनारी अर्थव्यवस्थांसाठी एक टिक-टिक करणारा टाईम बॉम्ब आहे. ते पुढे म्हणाले, ‘आपल्या समुद्रांची आम्लता जसजशी वाढत आहे, तसतसे आपण अनेक सागरी प्रजाती अवलंबून असलेले महत्त्वपूर्ण अधिवास नष्ट होताना पाहत आहोत आणि याचे गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होणार आहेत.’