

बर्लिन : अत्यधिक लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये फुफ्फुसांचे वय वेगाने वाढते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. जर्मनीतील बॉन विद्यापीठाच्या संशोधकांनी लठ्ठपणात फुफ्फुसे पोषणविषयक बदलांशी कसे जुळवून घेतात याची तपासणी केली.
संशोधकांच्या पथकाने दाखवले की, लठ्ठपणामुळे फुफ्फुसातील एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्समध्ये बदल होतो. हे प्रोटीन-आधारित ‘ढाचा’ फुफ्फुसांना त्यांचा आकार आणि स्थिरता प्रदान करतो. ‘सेल रिपोर्टस्’ नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात संशोधकांनी म्हटले आहे की, ‘फुफ्फुसांच्या ऊतींमधील हे बदल सामान्यतः वयानुसार होणार्या बदलांसारखेच आहेत आणि हे दर्शविते की, जास्त वजन असल्यामुळे फुफ्फुसे वेळेपूर्वीच ‘म्हातारपणात’ जातात.
संशोधनाच्या विशिष्ट प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी टीमने प्रथिने, चरबी आणि जनुके यांची एकाच वेळी तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक मल्टी-ओमिक्स पद्धतींचा वापर केला. या माहितीचा अभ्यास सूक्ष्मदर्शी प्रतिमेच्या विश्लेषणाच्या निष्कर्षांसह करण्यात आला. संशोधकांनी जाड आणि सडपातळ उंदरांच्या फुफ्फुसांची तुलना केली, तसेच फुफ्फुसातील मानवी संयोजी ऊती पेशींचे विश्लेषण केले. यामुळे त्यांना फुफ्फुसाच्या संरचनेतील आण्विक आणि कार्यात्मक दोन्ही बदल समजण्यास मदत झाली.
लठ्ठपणामध्ये, फुफ्फुसातील फायब्राेब्लास्ट (संयोजी ऊती पेशी) विशेषतः चरबी साठवतात. या पेशी अधिक गतिशील होतात आणि वेळेपूर्वी वृद्धत्वाचे सुरुवातीचे लक्षणे दर्शवतात. त्याच वेळी, फुफ्फुसाचे मॅट्रिसोम देखील बदलते आणि काही प्रोटीएज इनहिबिटरचे संतुलन बिघडते. संशोधकांनी स्पष्ट केले, ‘हे बदल फुफ्फुसांच्या लवचिकतेवर परिणाम करतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा संबंध अनेकदा श्वास घेण्यास होणार्या अडचणीशी का जोडला जातो, हे समजू शकते.’