

वॉशिंग्टन : चष्मा बनवणारी कंपनी ओकलेचे संस्थापक जेम्स जेनार्ड यांनी कॅलिफोर्नियामधील मालिबु येथे असलेले त्यांचे आलिशान घर विकले आहे. या घराची किंमत 210 मिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास 17 अब्ज रुपये) आहे. कॅलिफोर्नियामधील सर्वात महागड्या घरांपैकी हे एक घर आहे. खरेदीदाराची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
डेलावेयर येथील एका कंपनीने हे घर खरेदी केले आहे. जेम्स जेनार्ड यांनी 2012 मध्ये हे घर हॉवर्ड मार्क्स यांच्याकडून 75 मिलियन डॉलरला (जवळपास 6 अब्ज रुपये) खरेदी केले होते. हॉवर्ड मार्क्स यांनी 2002 मध्ये हर्बालाइफचे सह-संस्थापक मार्क ह्यूजेस यांच्याकडून 31 मिलियन डॉलरला (जवळपास 2.5 अब्ज रुपये) ते खरेदी केले होते. 15,000 स्क्वेअर फूटमध्ये (1,400 स्क्वेअर मीटर) असलेले हे घर 9.5 एकरमध्ये (4 हेक्टर) पसरलेले आहे.
या घराला स्वतःचा 300 फूट लांब समुद्रकिनारा आहे. घरामध्ये आठ बेडरूम, 14 बाथरूम, मोठे आवार, जिम आणि दोन गेस्ट हाऊस आहेत. लॉस एंजेलिसपासून 45 मिनिटांच्या अंतरावर असलेले मालिबु हे प्रसिद्ध बीच एन्क्लेव आहे. हे सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांचे आवडते ठिकाण आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि सर्वात श्रीमंत राज्य आहे. तेथील या आलिशान घराची किंमत आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली आहे.