

न्यूयॉर्क : तुमच्यासमोर बोलणारी व्यक्ती माणूस आहे की रोबो, हे ओळखणे आता कठीण होणार आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक असा रोबो तयार केला आहे, जो माणसाप्रमाणेच आपल्या ओठांच्या आणि तोंडाच्या हालचाली करू शकतो. ‘एमो’ (EMO) असे या रोबोचे नाव असून, तो दिसायला आणि बोलायला इतका नैसर्गिक वाटतो की, तो रोबो आहे असे ओळखणे कठीण होते.
आतापर्यंतचे रोबो जेव्हा माणसाची नक्कल करायचे, तेव्हा त्यांच्या हालचाली थोड्या विचित्र किंवा कृत्रिम वाटायच्या, ज्याला विज्ञानात ‘अनकॅनी व्हॅली’ प्रभाव म्हटले जाते. मात्र, ‘एमो’ ने यावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्याच्या चेहर्यात 26 मोटर्स बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तो अत्यंत सूक्ष्म भाव व्यक्त करू शकतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एमो’ने त्याचे शिक्षण एका वेगळ्या पद्धतीने पूर्ण केले आहे : सुरुवातीला ‘एमो’ला आरशासमोर ठेवण्यात आले. तिथे त्याने आपल्या चेहर्याच्या लवचिक सिलिकॉनच्या त्वचेच्या आणि मोटर्सच्या हजारो हालचालींचा अभ्यास केला. त्यानंतर त्याला यूट्यूबवरील विविध भाषांमधील बोलण्याचे आणि गाण्याचे व्हिडीओ दाखवण्यात आले.
यातून त्याने आवाजानुसार ओठांच्या हालचाली कशा असाव्यात, याचे तंत्र आत्मसात केले. सध्या हा रोबो 10 वेगवेगळ्या भाषांमधील आवाजांशी आपले ओठ अचूकपणे जुळवू शकतो. कोलंबियाच्या क्रिएटिव्ह मशिन्स लॅबचे संचालक हॉड लिपसन यांनी सांगितले की, ‘सुरुवातीला ‘B’ सारखे कडक अक्षर आणि ‘W’ सारखे ओठ गोल करावे लागणारे शब्द उच्चारताना ‘एमो’ला अडचणी येत होत्या. मात्र, सरावाने या कौशल्यात आणखी सुधारणा होईल.’ ‘एमो’ किती नैसर्गिक दिसतो, हे तपासण्यासाठी 1,300 स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. त्यांना विविध मॉडेल्सचे व्हिडीओ दाखवण्यात आले. त्यापैकी 62 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी मान्य केले की, ‘एमो’च्या ‘व्हिजन-टू-अॅक्शन’ तंत्रज्ञानामुळे होणार्या हालचाली सर्वात जास्त नैसर्गिक आणि मानवी वाटतात. संशोधनानुसार, जेव्हा दोन माणसे एकमेकांशी बोलतात, तेव्हा ते 87 टक्के वेळ एकमेकांच्या चेहर्याकडे बघत असतात. भविष्यात आरोग्य सेवा किंवा काळजी घेणार्या क्षेत्रात रोबोंचा वापर वाढणार आहे. अशा वेळी, जर रोबोचा चेहरा मैत्रीपूर्ण आणि नैसर्गिक असेल, तर लोकांसाठी त्यांच्याशी संवाद साधणे अधिक सोपे आणि विश्वासार्ह होईल.