कैरो : कोणत्या देशात जास्त पिरॅमिड आहेत, असा जर प्रश्न विचारला तर तुमचे उत्तर इजिप्त हेच असू शकते. मात्र, हे उत्तर खरे नाही. जगात असा एक देश आहे की, त्याबद्दल नेहमीच वेगळे बोलले जाते. तरीही हा देश पिरॅमिडच्या संख्येत इजिप्तपेक्षा सरस आहे. त्याचे नाव आहे 'सुदान.' मात्र, गरिबी, गृहयुद्ध, हिंसाचार व हुकूमशाही अशा अनेक कारणास्तव या देशाला भेट देणार्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. यामुळेच पिरॅमिड मोठ्या प्रमाणात असले, तरी या देशाबद्दल जगातील लोकांना फारसे माहीत नाही.
एका आकडेवारीनुसार, इजिप्तमधील पिरॅमिडची संख्या 138 आहे. तर सुदानमधील माहीत असलेले पिरॅमिड 200 ते 255 इतके आहेत. दुर्लक्षपणा, भ्रष्टाचार व योग्य व्यवस्थापनाचा अभाव, यामुळे सध्या सुदानमधील बहुतेक पिरॅमिडची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
पिरॅमिडची रचना पाहून असे वाटते की, भरकटलेल्या इजिप्तवासीयांनीच ते तयार केले असावेत. मात्र, हे बिल्कूल खरे नाही. सुदानमधील हे पिरॅमिड कुश साम्राज्याच्या राजांनी बांधले आहेत. त्यांनी इस 1070 ते इस पूर्व 350 या काळादरम्यान नील नदी किनारी राज्य केले होते. या पिरॅमिडचा वापर ते आपल्या मृत वंशजांना पुरण्यासाठी करत असत. दरम्यान, इजिप्त व सुदानमधील पिरॅमिडच्या आकारातही मोठे अंतर आहे. सुदानमधील पिरॅमिड हे 6 ते 30 मीटर आकाराचे तर इजिप्तमधील पिरॅमिड सरासरी सुमारे 453 फूट लांब आहेत.