

इस्तंबूल : जगात अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकून अंगावर काटा येतो. अशाच एका ठिकाणांपैकी एक म्हणजे सायप्रस या युरोपीय देशातील ‘वरोशा’ शहर. एकेकाळी हे शहर पर्यटकांनी गजबजलेले नंदनवन होते, पण आज ते ‘भुतांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. जवळपास 50 वर्षांपासून हे शहर पूर्णपणे निर्जन आहे.
एकेकाळी वरोशामध्ये 40 हजारांहून अधिक लोक राहत होते. येथे आलिशान हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, सुंदर समुद्रकिनारे, रुग्णालये, शाळा, बाजारपेठा आणि प्रशस्त रस्ते होते. पण जुलै 1974 मध्ये एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. ग्रीसमधील राष्ट्रवादी उठावाला पाठिंबा दिल्याच्या रागातून तुर्की सैन्याने सायप्रसवर हल्ला केला आणि वरोशा शहराला लक्ष्य बनवले.
तुर्की सैन्याच्या आक्रमणामुळे आणि मृत्यूच्या भीतीने शहरातील सुमारे 40 हजार नागरिकांनी एका रात्रीत आपले घरदार सोडून पलायन केले. याचदरम्यान, वरोशामध्ये एक भूत असून, ते लोकांना मारत असल्याची अफवाही पसरली होती. या संघर्षानंतर सायप्रसची विभागणी झाली आणि वरोशा तुर्कस्तानच्या नियंत्रणाखाली आले. तेव्हापासून हे शहर पूर्णपणे सील करण्यात आले असून, ते तुर्की सैन्याच्या ताब्यात आहे. येथे सामान्य नागरिकांना प्रवेशास सक्त मनाई आहे. आजही वरोशातील उंच इमारती, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस् 1974 प्रमाणेच उभी आहेत. मात्र, काळाच्या ओघात त्यांची पडझड होऊन ती भग्नावस्थेत पोहोचली आहेत. एकेकाळचे हे सुंदर शहर आज एका रहस्यमय आणि भयाण वास्तवाचे प्रतीक बनले आहे.