

वॉशिंग्टन : आतापर्यंत आपण फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी ‘पोर्टेबल पॉवरबँक’चा वापर केल्याचे ऐकले आणि पाहिले असेल. मात्र, आता तुम्ही तुमच्यासोबत थेट एक लहान ‘पोर्टेबल पवनचक्की’ घेऊन फिरू शकता, जी वाऱ्याच्या मदतीने तुम्हाला कुठेही वीज तयार करून देईल.
अमेरिकेच्या कोलोरॅडो येथील ‘डीआयवाय इलेक्ट्रॉनिक्स’ या स्टार्टअप कंपनीने ही अनोखी पोर्टेबल पवनचक्की तयार केली असून, तिला ‘Ventyra R1’ असे नाव देण्यात आले आहे. सहसा अशा पोर्टेबल पवनचक्क्या वजनाने खूप जड असतात. मात्र, Ventyra R1 चे वजन अवघे १ किलो आहे. यामुळे ती सहजपणे बॅगेत ठेवून कुठेही नेली जाऊ शकते. या टर्बाइनची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, वीज तयार करण्यासाठी खूप वेगवान वाऱ्याची गरज भासत नाही. वाऱ्याच्या हलक्या झुळुकीवरही हे टर्बाइन काम करू शकते. ही पवनचक्की सतत ५० वॉट (50W) पर्यंत वीज निर्माण करू शकते आणि तिचा पीक लोड ७५ वॉट (75W) आहे.
यामध्ये एक ‘टेल वेन’ देण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने ही पवनचक्की वाऱ्याच्या दिशेनुसार स्वतःची दिशा आपोआप सेट करते. त्यामुळे वारंवार वाऱ्याची दिशा तपासण्याची गरज पडत नाही. या पोर्टेबल पवनचक्कीसोबत एक फोल्डेबल ट्रायपॉड स्टँड आणि ४ ग्राऊंड स्टेक्स (खुट्या) मिळतात. याच्या मदतीने तंबू ठोकल्याप्रमाणे तिला जमिनीवर घट्ट रोवून ठेवता येते, ज्यामुळे एकदा बसवल्यानंतर वीज निर्मिती बिनधास्तपणे सुरू राहते. या पवनचक्कीतून तयार होणारी वीज XT60 आऊटपुट केबलद्वारे पॉवर हबमध्ये पाठवली जाते (12V DC सपोर्ट).
वारा चांगला असेल तर ही पवनचक्की अवघ्या ३५ मिनिटांत स्मार्टफोन पूर्ण चार्ज करू शकते. याच्या पॉवर हबद्वारे स्मार्टफोन, टॅब्लेट, पॉवरबँक, डीएसएलआर कॅमेरा, इमर्जन्सी लाईटस् आणि लॅपटॉपदेखील सहज चार्ज करता येतात. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एकाच पॉवर हबसोबत एकापेक्षा जास्त Ventyra R1 टर्बाइन्स जोडले जाऊ शकतात, ज्यामुळे अधिक वीज निर्माण करता येते. शिवाय, उत्तम पॉवर बॅकअपसाठी ही पवनचक्की सोलर पॅनेलसोबतही पेअर केली जाऊ शकते. त्यामुळे दिवसा उन्हापासून आणि रात्री वाऱ्यापासून अखंडित वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे.