

रिओ डी जानेरिओ : जगातील सर्वात मोठ्या नद्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीचा समावेश होतो. ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटल्या जाणार्या अॅमेझॉन जंगलाचे भरणपोषण करीत वाहणारी ही नदी गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिन माशांचाही सर्वात मोठा नैसर्गिक अधिवास आहे. शंभर प्रजातींचे इलेक्ट्रिक मासे आणि 60 प्रजातींचे पिर्हाना मासेही या नदीत आढळतात. पेरू, कोलंबिया, इक्वेडोर आणि ब्राझिल यासारख्या तब्बल नऊ देशांमधून वाहणार्या या नदीवर एकही पूल नाही हे विशेष!
अॅमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेच्या सुमारे 40 टक्के भागाला व्यापते. तिच्या खोर्यात 3 कोटींपेक्षाही अधिक लोक राहतात. तरीही या नदीवर पूल नाही हे खरे तर आश्चर्यकारकच आहे. त्याचे कारण काय आहे याची माहिती स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वित्झर्लंडच्या ज्युरिखमधील संस्थेचे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विषयाचे तज्ज्ञ असलेल्या वॉल्टर कॉफमन यांनी दिली. त्यांनी सांगितले की अॅमेझॉन नदीवर पुलाची आवश्यकताच नाही! अॅमेझॉन नदी बहुतांशी ज्या परिसरातून वाहते, तिथे अतिशय कमी लोकसंख्या आहे. तसेच पुलाची दोन्ही टोके जोडण्यासारखे प्रमुख रस्तेही तिथे कमीच आहेत. नदीच्या काठी असलेल्या खेडी व शहरांमधील लोकांना प्रवास तसेच मालवाहतूक करण्यासाठी पुरेशा नावा आणि फेरी उपलब्ध आहेत. त्यामुळे तिथे कधीही पुलाची आवश्यकता भासत नाही.
शिवाय अॅमेझॉनवर पूल बांधण्याच्या मार्गात काही तांत्रिक व ‘लॉजिस्टिक’ आव्हानेही आहेत. या नदीचे दोन्ही काठ पूल उभा करण्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल आहेत. तेथील माती अतिशय नरम आहे व दलदलीचे प्रमाण अधिक आहे. पूल उभा करण्यासाठी अतिशय खोल पाया काढावा लागेल. त्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तेथील हवामानही अतिशय चंचल आहे आणि पाण्याच्या खोलीत सातत्याने बदल होत असतो. त्यामुळेही तिथे पुलाचे बांधकाम करणे कठीण आहे. या नदीच्या पाण्याचा स्तर वर्षात अनेक वेळा वाढत किंवा कमी होत असतो. अशा विविध कारणांमुळे आजपर्यंत या लांबलचक व मोठ्या नदीवर एकही पूल नाही!