

बीजिंग : संशोधकांनी अशा कॉन्टॅक्ट लेन्स विकसित केल्या आहेत, ज्या वापरकर्त्याला ‘सुपर-व्हिजन’ मिळवून देऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. या लेन्स नॅनोपार्टिकल्स वापरून तयार केल्या आहेत, ज्या कमी वारंवारतेच्या प्रकाशाला शोषून तो द़ृश्यमान प्रकाशामध्ये रूपांतरित करतात आणि त्यामुळे वापरकर्त्याला इन्फ्रारेड (infrared) प्रकाश दिसू लागतो, जो सामान्यतः मानवी डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे अगदी रात्रीच्या अंधारातही पाहण्याची क्षमता माणसाला मिळू शकते! इतकेच नव्हे तर चक्क डोळे मिटलेले असतानाही माणसाला दिसू शकेल.
विशेष म्हणजे, पारंपरिक नाईट-व्हिजन गॉगल्सप्रमाणे या लेन्सना कोणत्याही ऊर्जा स्रोताची गरज भासत नाही. या संशोधनाची माहिती ‘सेल प्रेस’ या जर्नलमध्ये 22 मे रोजी प्रकाशित झाली. या संशोधनाचे प्रमुख लेखक, चायना युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे न्यूरोससायंटिस्ट टियान शुए म्हणाले, “हे संशोधन लोकांना ‘सुपर-व्हिजन’ देणार्या अनावश्यक (non- invasive) वेअरेबल डिव्हाइसेसच्या शक्यता उघडते. सुरक्षा, बचाव, एनक्रिप्शन, बनावट रोखण्यासाठी अशा अनेक क्षेत्रांमध्ये याचा वापर होऊ शकतो.” पारंपरिक नाईट-व्हिजन गॉगल्स पहिल्यांदा दुसर्या महायुद्धात वापरले गेले.
हे गॉगल्स दृश्य प्रकाश किंवा जवळच्या इन्फ्रारेड फोटॉन्सना इलेक्ट्रॉन्समध्ये रूपांतरित करतात आणि त्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स फॉस्फोर स्क्रीनवर आपटतात, ज्यामुळे ती हिरवी चमकते. मात्र, या गॉगल्सना ऊर्जा स्रोत लागतो आणि त्यामुळे ते जडसर असतात. शिवाय हे गॉगल्स पूर्ण इन्फ्रारेड स्पेक्ट्रममध्ये प्रकाश ओळखण्यात सक्षम नसतात. नवीन लेन्स तयार करताना, संशोधकांनी नॉनटॉक्सिक, लवचिक अशा पॉलिमरमध्ये नॅनोपार्टिकल्स बसवले, जे सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्समध्ये वापरले जातात. या नॅनोपार्टिकल्समध्ये सोडियम गॅडोलिनियम फ्लोराईड असते आणि त्यात ल्युमिनसंट टर्बियम, एर्बियम आणि सोनं मिसळलेलं असतं. हे कण 800 ते 1600 नॅनोमीटर रेंजमधील इन्फ्रारेड प्रकाश शोषून त्याला 380 ते 750 नॅनोमीटर रेंजमध्ये दृश्यमान प्रकाशात रूपांतरित करतात.
या लेन्स सर्वप्रथम उंदरांवर चाचणीत वापरण्यात आल्या. लेन्स घातलेल्या उंदरांनी इन्फ्रारेड प्रकाश असलेल्या पेट्या टाळून अंधार्या पेट्यांमध्ये जाणं पसंत केलं, तर लेन्स नसलेल्या उंदरांनी अशी कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. याशिवाय लेन्स घातलेल्या उंदरांच्या डोळ्यांच्या बुबळी इन्फ्रारेड प्रकाशात आकुंचन पावत होत्या आणि त्यांच्या मेंदूतील व्हिज्युअल प्रोसेसिंग सेंटर्समध्ये हालचाल दिसून आली. यानंतर माणसांवरही या लेन्सची चाचणी करण्यात आली. लोकांना इन्फ्रारेड प्रकाशाची लयबद्ध हालचाल दिसू लागली आणि त्या प्रकाशाच्या दिशेचाही अंदाज घेता आला.
संशोधक म्हणाले की, जेव्हा सहभागी डोळे मिटून घेतात, तेव्हा ही इन्फ्रारेड दृष्टी आणखी स्पष्ट होते. कारण इन्फ्रारेड प्रकाश पापण्या अधिक सहज भेदून जातो. “हे परिणाम अगदी स्पष्ट आहेत. लेन्सशिवाय कोणतीही हालचाल दिसत नाही, पण लेन्स घातल्यानंतर ती इन्फ्रारेड चमक स्पष्ट दिसू लागते,” असे शुए म्हणाले. “आम्ही जेव्हा डोळे बंद ठेवून पाहणं सुचवलं, तेव्हा अधिक अचूक माहिती मिळाली.” शेवटी, संशोधकांनी लेन्समधील नॅनोपार्टिकल्स बदलून अशा प्रकारे सुधारित केल्या की त्या इन्फ—ारेड प्रकाशाच्या विशिष्ट भागांना निळा, हिरवा आणि लाल रंगात रूपांतरित करतात. ही सुधारणा रंगांधळेपणा असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी वापरता येऊ शकते.