

जकार्ताः जगभरात लग्नविधींबाबत अनेक विचित्र प्रथाही पाहायला मिळतात. कुठे लग्नाआधी नवरी महिनाभर रडत बसते, तर कुठे नवरीच्या डोक्यावर थुंकून तिला आशीर्वाद दिला जातो! इंडोनेशियातही अशीच एक अनोखी प्रथा आहे. तेथील टीडाँग नावाच्या समुदायात लग्न झाल्यानंतर नवपरिणित जोडप्याला शौचालयात जाण्यास बंदी असते. हा एक अनोखा रिवाज असला तरी या समुदायात तो कसोशीने पाळला जातो! शौचालयात गेल्याने नवपरिणित जोडप्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, असा त्यांचा समज आहे.
या रिवाजानुसार नवीन जोडप्यापैकी कुणाला किंवा दोघांनाही टॉयलेटला जावे लागले तर तो मोठाच अपशकून मानला जातो! त्यामुळे तीन दिवस वधू-वरांना मोजकंच अन्न दिले जाते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार लग्न हा एक पवित्र विधी आहे. लग्नानंतर लगेचच वधू-वर शौचालयात गेल्यास हे पावित्र्य भंगते व त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. ही प्रथा पाळण्याचे दुसरे एक कारण म्हणजे नववधू व वराला नजर लागू नये. शिवाय शौचालयाचा वापर अनेक लोक करतात व आपले पोट साफ करतात. त्यामुळे शौचालयात नकारात्मक शक्ती असतात, असे या लोकांना वाटते. याचा परिणाम म्हणून बिचार्या नवरा-नवरीला तीन दिवस पोट सांभाळत राहावे लागते!