

वॉशिंग्टन : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेहमीच काहीतरी विचित्र आणि अजब विक्रम नोंदवले जातात. असाच एक विक्रम अमेरिकेतील डेव्हिड रश आणि त्याचा मित्र जोनाथन हॅनन यांनी केला आहे. या दोघांनी एकमेकांच्या शरीरामध्ये फुगे ठेवून ते फोडण्याचा विक्रम अवघ्या 7.5 सेकंदात पूर्ण केला आहे.
डेव्हिड रश हे नाव गिनीज रेकॉर्डसाठी नवीन नाही. त्यांच्या नावावर आधीच 181 पेक्षा जास्त विश्वविक्रम आहेत. सुरुवातीला त्यांनी आणि जोनाथन यांनी 10 फुगे शरीराने फोडण्याचा विक्रम 15 सेकंदात पूर्ण केला होता. त्यावेळी 17 सेकंदांचा जुना विक्रम त्यांनी मोडला होता. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच कोल्टन शेपर्ड आणि कॅमरून सेवरसन या जोडीने हाच विक्रम अवघ्या 11 सेकंदात पूर्ण करून रश यांचा विक्रम मोडला.
यानंतर डेव्हिड आणि जोनाथन यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांनी अविश्वसनीय कामगिरी करत केवळ 7.5 सेकंदात 10 फुगे फोडून दाखवले. या विक्रमाचे सर्व पुरावे आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्च्या टीमकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्याकडून तपासणी झाल्यानंतरच या विक्रमावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल; पण डेव्हिड आणि जोनाथन यांनी केलेला हा प्रयत्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.