

लंडन : माऊंट व्हिसुवियस ज्वालामुखीय उद्रेकात जळून खाक झालेल्या २००० वर्षे जुन्या पेपायरस गुंडाळ्यांमधील प्राचीन तत्त्वज्ञांचे विचार आता वाचता येणे शक्य होणार आहे. शाईमध्ये वापरण्यात आलेल्या ‘शिसे’ या जड धातूचा वापर करून संशोधकांनी ही नवीन तंत्रज्ञानाची दिशा शोधून काढली आहे.
१७५० च्या दशकात हर्क्युलेनियम शहरातील एका अलिशान राजवाड्यात या २००० वर्षांपूर्वीच्या पेपायरस गुंडाळ्या सापडल्या होत्या. हा राजवाडा ज्युलियस सिझर यांच्या सासरच्या मंडळींचा असावा असा इतिहासकारांचा अंदाज आहे. संशोधकांनी शिशाच्या शाईचा वापर करून आधुनिक गुंडाळ्या तयार केल्या, त्या जाळल्या आणि एक्स-रे तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने त्यातील मजकूर यशस्वीरीत्या वाचून दाखवला. पेपायरस कागद आणि त्यावर वापरलेली शाई दोन्ही ‘कार्बन-आधारित’ असल्याने एक्स-रेच्या साहाय्याने मजकूर वेगळा ओळखणे कठीण जात होते. परंतु, काही हस्तलिखितांमध्ये शिशाची शाई वापरल्याचे समोर आल्याने आता ही नवी पद्धत उपयुक्त ठरणार आहे.
‘यूसी बर्कले’चे संशोधक डग्लस सायलर आणि त्यांच्या टीमने ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. संशोधकांच्या मते, प्रथम गुंडाळ्यांमध्ये शिशाची शाई आहे का हे स्कॅन केले जाईल आणि नंतर या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मजकूर वाचला जाईल. या कमी धोक्याच्या तंत्रज्ञानामुळे अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान ऐतिहासिक हस्तलिखितांना कोणताही भौतिक धोका न पोहोचवता मजकूर ओळखणारे ‘अल्गोरिदम’ सुधारणे शक्य होईल. यापूर्वी डिजिटल पद्धतींचा वापर करून एपिक्युरियन आणि स्टॉईक तत्त्वज्ञांचे लेखन, तसेच प्लेटोच्या अंतिम विश्रांतीच्या जागेचा उल्लेख असलेले दस्तावेज उलगडण्यात यश आले आहे. नव्या शोधामुळे प्राचीन इतिहासातील अनेक रहस्ये समोर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.