

रोम : युरोपातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी असलेल्या माऊंट एटनाच्या खालील मॅग्माच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा एक नवीन मार्ग शास्त्रज्ञांना सापडला आहे. या पद्धतीमुळे ज्वालामुखी कधी फुटेल, याचा अंदाज वर्तवणे भविष्यात अधिक सोपे होऊ शकते. माऊंट एटना हा इटलीतील सिसिली बेटावर असलेला युरोपातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे. जवळपास 5 लाख वर्षांपासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे आणि गेल्या 2,700 वर्षांपासून मानवाने त्याची नोंद केली आहे.
या ज्वालामुखीचा सर्वात अलीकडील मोठा उद्रेक जून 2025 मध्ये झाला होता. या उद्रेकात 4 मैल (6.5 किलोमीटर) उंच राखेचा प्रचंड ढग बाहेर पडला आणि गरम लाव्हाचे खडक व इतर घटकांचा ढिगारा यांचा मोठा प्रवाह खाली आला. हा उद्रेक अपेक्षित असल्याने अधिकार्यांनी सकाळीच लोकांना इशारा दिला होता. मात्र, अनेकदा हे अंदाज पूर्णपणे अचूक ठरत नाहीत. माऊंट एटनाच्या उद्रेकाचा अंदाज अधिक अचूक करण्यासाठी इटलीच्या राष्ट्रीय भूभौतिकी आणि ज्वालामुखी विज्ञान संस्थेतील (INGV) संशोधकांनी एक नवीन अभ्यास केला आहे.
या अभ्यासात त्यांनी ‘बी व्हॅल्यू’ नावाच्या एका घटकाचे विश्लेषण केले. ‘बी व्हॅल्यू’ म्हणजे पृथ्वीच्या कवचाच्या एका विशिष्ट प्रदेशातील कमी तीव्रतेच्या भूकंपांचे, जास्त तीव्रतेच्या भूकंपांशी असलेले प्रमाण होय. ज्वालामुखीच्या शिखराकडे मॅग्मा वर येतो तेव्हा हे प्रमाण बदलते, असे संशोधकांनी ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ नावाच्या शोधपत्रिकेत 8 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे. INGV च्या एटना वेधशाळेतील भूभौतिकशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मार्को फायरट्टो कार्लीनो यांनी सांगितले, ‘काळानुसार ‘बी व्हॅल्यू’मध्ये होणारे बदल ज्वालामुखीच्या आत तयार होणार्या तणावाचे स्वरूप दर्शवतात.
’ मॅग्मा वर सरकल्यामुळे कवचामध्ये तणाव निर्माण होतो. त्यामुळे, ‘बी व्हॅल्यू’ चा मागोवा घेतल्यास मॅग्माचे पृष्ठाभागाकडे होणारे स्थलांतरण कोणत्या टप्प्यावर आहे, हे समजण्यास मदत होईल.‘बी व्हॅल्यू’ हा घटक ज्वालामुखी विज्ञानात पूर्वीपासून वापरला जातो, पण संशोधकांनी एका अद्ययावत सांख्यिकीय मॉडेलचा वापर करून त्याचे नवीन पद्धतीने विश्लेषण केले. माऊंट एटनाच्या 20 वर्षांच्या भूकंप डेटाचे संकलन करून त्यांनी ‘बी व्हॅल्यू’ आणि ज्वालामुखीच्या क्रियेमध्ये ‘अत्यंत मजबूत’ संबंध असल्याचे शोधले आहे.