New Virus | मांजरामुळे नव्या विषाणूचा लागला शोध!

हा नवीन विषाणू एका मृत नावाच्या चिचुंद्रीच्या शरीरात आढळला
new-virus-discovered-due-to-cat
मांजरामुळे नव्या विषाणूचा लागला शोध!Pudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : एका शास्त्रज्ञाची मांजर गेल्या वर्षी अमेरिकेतील पहिल्या ‘जीलॉन्गव्हायरस’च्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आता ‘पेपर’ नावाच्या या मांजराने पुन्हा एकदा तशीच कामगिरी केली आहे. त्याने शिकार करून घरी आणलेल्या एका प्राण्याच्या शरीरात यापूर्वी कधीही न आढळलेला एक नवीन विषाणू सापडला आहे, ज्यामुळे वैज्ञानिक वर्तुळात पुन्हा एकदा कुतूहल निर्माण झाले आहे.

हा नवीन विषाणू एका मृत ‘एव्हरग्लेडस् शॉर्ट-टेल्ड श्रू’ (Blarina peninsulae) नावाच्या चिचुंद्रीच्या शरीरात आढळला. पेपरने फ्लोरिडातील गेनेसविले येथील आपल्या घराजवळ यशस्वी शिकार केल्यानंतर या प्राण्याला घरी आणले होते. पेपरचा मालक आणि फ्लोरिडा विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ जॉन लेडनिकी यांनी आपल्या पाळीव मांजराने आणलेली ही शिकार उचलली आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेली.

प्रयोगशाळेतील चाचणीत असे दिसून आले की, या चिचुंद्रीच्या शरीरात ‘ऑर्थोरिओव्हायरस’ या विषाणूचा एक नवीन प्रकार होता. ऑर्थोरिओव्हायरस हा एक असा विषाणू गट आहे ज्याबद्दल अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही. हा विषाणू पक्षी आणि विविध सस्तन प्राण्यांना, ज्यात माणसे, पांढर्‍या शेपटीचे हरीण आणि वटवाघूळ यांचा समावेश आहे, संक्रमित करू शकतो. लेडनिकी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपले हे संशोधन 10 जून रोजी ‘मायक्रोबायोलॉजी रिसोर्स अनाऊन्समेंटस्’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले.

‘याचा निष्कर्ष असा आहे की, आपण ऑर्थोरिओव्हायरसकडे लक्ष देणे आणि ते वेगाने कसे ओळखायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे,’ असे लेडनिकी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. याचे कारण म्हणजे या विषाणूंमुळे मानवामध्ये गंभीर आजार झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. ऑर्थोरिओव्हायरसचा शोध 1950 च्या दशकात लागला होता. हा विषाणू विष्ठेद्वारे किंवा श्वासावाटे पसरतो आणि सामान्यतः यजमानाच्या श्वसनमार्गावर किंवा आतड्यांवर परिणाम करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news