Gum killing bateria | गुड बॅक्टेरियाला धक्का न लावता हिरड्यांचे आजार रोखणरा नवा उपाय

Gum killing bateria |
Gum killing bateria | गुड बॅक्टेरियाला धक्का न लावता हिरड्यांचे आजार रोखणरा नवा उपाय
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपल्या तोंडात राहणार्‍या जीवाणूंना (बॅक्टेरिया) मारून टाकण्याऐवजी, त्यांच्यातील संवाद खंडित करून हिरड्यांचे आजार रोखता येतात, अशा एका क्रांतिकारी उपचाराचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. या नवीन पद्धतीमुळे हानिकारक जीवाणूंची वाढ रोखता येईल आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गुड बॅक्टेरियाचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.

काय आहे हा नवा शोध?

डेन्टल प्लॅक (दातांवरील थर) मधील जीवाणू एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विशिष्ट रासायनिक लहरींचा वापर करतात, ज्याला विज्ञानाच्या भाषेत कोरम सेन्सिंग म्हटले जाते. शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे की, जर या रासायनिक लहरींमध्ये अडथळा आणला, तर हिरड्यांच्या आजारास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव कमी होतात आणि आरोग्यदायी जीवाणूंची संख्या वाढते.ऑक्सिजनच्या पातळीचा प्रभाव या संशोधनाचे मुख्य लेखक राकेश सिकदार यांनी सांगितले की, तोंडातील ऑक्सिजनची पातळी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. हिरड्यांच्या वरच्या भागात (जेथे ऑक्सिजन असतो) आणि हिरड्यांच्या खाली (जेथे ऑक्सिजन नसतो) जीवाणूंचा संवाद वेगवेगळ्या प्रकारे चालतो. या संवादामध्ये अडथळा आणून हिरड्यांच्या आजारावर अधिक प्रभावी उपचार करता येतील.

जीवाणू मारण्याऐवजी त्यांच्यातील रासायनिक संदेशांना ब्लॉक केल्यास नैसर्गिक संतुलन राखले जाते. सध्या अनेक हानिकारक जीवाणू अँटीबायोटिक्सला दाद देत नाहीत. अशा परिस्थितीत ही नवीन उपचार पद्धती मैलाचा दगड ठरू शकते. अँटीबायोटिक्सला पर्याय म्हणून पुढे येऊ शकते. उपचाराची ही पद्धत केवळ आजार रोखत नाही, तर तोंडाचे आरोग्य चांगले ठेवणार्‍या जीवाणूंना प्रोत्साहन देते.

कॉलेज ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसचे असोसिएट प्रोफेसर मायकेल एलियास यांच्या मते, ही पद्धत केवळ दंतचिकित्सेपुरती मर्यादित नसून, शरीरातील इतर सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. शरीरातील सूक्ष्मजीवांचे असंतुलन हे काही प्रकारच्या कॅन्सरला देखील कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे हा शोध भविष्यातील आरोग्य उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news