Audio Augmented Reality | दृष्टिबाधितांसाठी रस्ता शोधणे होणार सोपे

‘आयआयआयटी दिल्ली’ विकसित करणार खास तंत्रज्ञान
Audio Augmented Reality |
Audio Augmented Reality | दृष्टिबाधितांसाठी रस्ता शोधणे होणार सोपे
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : दृष्टिबाधित आणि कमी दृष्टी असलेल्या व्यक्तींना मोठ्या इमारती, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी रस्ता शोधणे आता अधिक सुलभ होणार आहे. यासाठी इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) दिल्लीचे संशोधक ध्वनी आधारित संवर्धित वास्तविकता म्हणजेच ‘ऑडिओ ऑग्मेंटेड रियलिटी’ (Audio Augmented Reality) तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधन करणार आहेत.

या प्रकल्पासाठी संस्थेचे दोन प्राध्यापक डॉ. ऋचा गुप्ता आणि डॉ. अनमोल श्रीवास्तव यांना ‘क्वालकॉम एक्सआर युनिव्हर्सिटी रिसर्च ग्रँट-२०२६’ अंतर्गत सुमारे ६२ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या संशोधनात डॉ. ऋचा गुप्ता मुख्य संशोधक (PI) तर डॉ. अनमोल श्रीवास्तव सहसंशोधक म्हणून काम पाहणार आहेत. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढील तीन वर्षे सखोल संशोधन चालणार असून, या प्रकल्पाला ‘पाथसेन्स’ असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत ध्वनी आधारित संवर्धित वास्तविकता तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शक्यतांवर काम केले जाईल. कोणत्याही बाह्य मदतीशिवाय दृष्टिबाधित व्यक्तींना मोठ्या इनडोअर ठिकाणी (इमारतींच्या आत) रस्ता ओळखण्यास आणि आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यास सक्षम बनवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. संशोधनादरम्यान दृष्टिबाधित लोक न पाहता सभोवतालचे वातावरण कसे समजून घेतात, याचा अभ्यास केला जाईल. तसेच, ध्वनी आणि इतर गैर-दृश्य संकेतांच्या माध्यमातून त्यांना एखाद्या इमारतीची किंवा ठिकाणाची रचना आणि रस्त्यांची माहिती कशी देता येईल, यावरही भर दिला जाणार आहे. याप्रसंगी डॉ. ऋचा गुप्ता म्हणाल्या की, मोठ्या इमारतींमध्ये रस्ता शोधताना दृष्टिबाधित व्यक्तींसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. तर, केवळ रस्ता दाखवणे हा या संशोधनाचा उद्देश नसून, ज्या ठिकाणी दृष्टिबाधित व्यक्ती चालत आहेत त्या संपूर्ण जागेची रचना समजून घेण्यास त्यांना मदत करणे हा यामागील मुख्य हेतू असल्याचे डॉ. अनमोल श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.