

मॉन्ट्रियल (कॅनडा) : जगभरात स्वच्छ ऊर्जेचा शोध सुरू असताना वैज्ञानिकांनी एक मोठे यश संपादन केले आहे. विजेच्या साहाय्याने पाण्याचे रेणू फोडून त्यातून हायड्रोजन वेगळा करण्याच्या प्रक्रियेत वैज्ञानिकांनी आता दुप्पट हायड्रोजन मिळवण्याचे तंत्र विकसित केले आहे. या नवीन पद्धतीमुळे हायड्रोजन निर्मितीसाठी लागणार्या वीज खर्चात तब्बल 40 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
1 डिसेंबर रोजी ‘केमिकल इंजिनिअरिंग जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा खुलासा करण्यात आला आहे. अभ्यासाचे सह-लेखक आणि संशोधक हामेद हैदरपूर यांनी सांगितले की, ‘सध्या हायड्रोजन हे सर्वाधिक मागणी असलेल्या रसायनांपैकी एक आहे.‘हायड्रोजनचा वापर प्रामुख्याने पुढील कारणांसाठी केला जातो : 1. खतनिर्मितीसाठी लागणार्या अमोनियाच्या उत्पादनात. 2. इलेक्ट्रिकल ऊर्जा निर्माण करणार्या फ्युएल सेल्समध्ये. 3. थेट इंधन म्हणून जाळून ऊर्जा मिळवण्यासाठी. सध्या हायड्रोजन प्रामुख्याने ‘स्टीम रिफॉर्मिंग’ पद्धतीने बनवला जातो, ज्यामध्ये नैसर्गिक वायूचा वापर होतो. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन जाळावे लागते, ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. याउलट, नवीन ‘इलेक्ट्रोलिसिस’ पद्धतीमुळे कार्बन उत्सर्जनाशिवाय मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्त दरात हायड्रोजन निर्मिती शक्य होणार आहे.
संशोधकांच्या मते, हे तंत्रज्ञान भविष्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन उत्पादनासाठी एक ‘आशादायक मार्ग’ ठरू शकते, जे पर्यावरणापूरक आणि किफायतशीर असेल. ‘ही सुधारित पद्धत एकाच वेळी निर्माण होणार्या हायड्रोजनचे प्रमाण प्रभावीपणे दुप्पट करते; यामध्ये कॅथोडवर (ऋण अग्र) नेहमीप्रमाणे पाण्याचे रेणू फोडून तयार होणार्या हायड्रोजनचाही समावेश आहे. ही प्रक्रिया सुमारे 0.4 व्होल्टवर पार पडली, जी पारंपारिक ‘वॉटर इलेक्ट्रोलिसिस’ पद्धतीपेक्षा सुमारे 1 व्होल्टने कमी आहे. संशोधकांच्या मते, यामुळे एकूण ऊर्जा वापरामध्ये 40 टक्क्यांपर्यंत बचत होण्यास मदत होते. हैदरपूर यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारची रणनीती मांडणारे त्यांचे पथक पहिलेच नाही; परंतु त्यांनी अधिक कार्यक्षम ‘कॅटॅलिस्ट’ (उत्प्रेरक) वापरून हायड्रोजन उत्पादनाचा एकूण वेग वाढवला आहे.
सर्वसाधारणपणे ‘इलेक्ट्रोलिसिस’ प्रक्रियेत पाण्यामधून वीज प्रवाहित करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातातय; मात्र या प्रक्रियेत ऑक्सिजन तयार होण्यासाठी लागणारी ऊर्जा खूप जास्त असते, ज्यामुळे ही पद्धत महागडी ठरते. कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी या प्रक्रियेत एक बदल केला आहे. त्यांनी रिअॅक्टरमध्ये एक साधे सेंद्रिय रेणू (Organic Molecule) आणि सुधारित उत्प्रेरक (Modified Catalyst) जोडला आहे. यामुळे धन अग्रावर (Anode) ऑक्सिजन तयार होण्याऐवजी सेंद्रिय रेणूंच्या ऑक्सिडीकरणातून अधिक प्रमाणात हायड्रोजन तयार होतो.