

वॉशिंग्टन : एडस्ला कारणीभूत ठरणार्या एचआयव्ही विषाणूला निष्क्रिय करण्याच्या दिशेने अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक मोठी झेप घेतली आहे. संशोधकांनी एका अशा रेणूचा शोध लावला आहे, जो एचआयव्ही विषाणूला दीर्घकाळासाठी ‘सुप्त’ अवस्थेत (dormant state) पोहोचवू शकतो. जीन थेरपीच्या माध्यमातून हे कायमस्वरूपी शक्य होऊ शकते, ज्यामुळे रुग्णांना दररोजच्या औषधोपचाराच्या त्रासातून मोठी सुटका मिळू शकते.
अमेरिकेतील प्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासानुसार, मानवी शरीरातील एचआयव्ही विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी जीन थेरपी अत्यंत प्रभावी ठरू शकते. हा क्रांतिकारक शोध केवळ विषाणूला कायमस्वरूपी रोखण्याची क्षमता ठेवत नाही, तर सध्या वापरल्या जाणार्या अँटिरेट्रोव्हायरल औषधांच्या गंभीर दुष्परिणामांपासूनही रुग्णांची मुक्तता करू शकतो. हे संपूर्ण संशोधन प्रतिष्ठित ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनात ‘अँटिसेन्स ट्रान्सक्रिप्ट’ नावाच्या एका विशेष रेणूची भूमिका स्पष्ट केली आहे.
हा रेणू एचआयव्हीच्याच अनुवांशिक सामग्रीतून तयार होतो आणि विषाणूला अशा ‘सुप्त’ अवस्थेत पोहोचवतो, जिथे तो स्वतःची संख्या वाढवू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा रेणू विषाणूच्या वाढीच्या प्रक्रियेलाच ‘लॉक’ करतो. या संशोधनाचा एक महत्त्वाचा भाग 15 एचआयव्हीग्रस्त रुग्णांवर आधारित होता. त्या रुग्णांच्या परवानगीने त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती पेशी गोळा करण्यात आल्या. या पेशींमध्ये शास्त्रज्ञांनी अडढ रेणू टाकून विषाणू सक्रिय राहतो की नाही, हे तपासले. या प्रयोगातही विषाणू निष्क्रिय झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे संशोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगात सुमारे 3.99 कोटी लोक एचआयव्हीने संक्रमित आहेत, त्यापैकी दरवर्षी 6.3 लाख लोकांचा मृत्यू होतो. सध्या यावर मुख्य उपचार म्हणून अँटिरेट्रोव्हायरल थेरपी वापरली जाते, ज्यामध्ये रुग्णाला आयुष्यभर दररोज औषधे घ्यावी लागतात. या औषधांच्या दीर्घकाळ वापरामुळे यकृताचे नुकसान, चयापचय क्रियेत बिघाड आणि हाडांची कमजोरी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. याउलट, जीन थेरपीचा परिणाम पहिल्याच डोसमधून दिसू शकतो आणि ती रुग्णाला कायमस्वरूपी आराम देऊ शकते.