

लंडन ः संशोधकांनी आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक प्रगत स्टेथोस्कोप विकसित केला आहे, जो अवघ्या 15 सेकंदात हृदयाशी संबंधित तीन मोठे आजार ओळखू शकतो. यामध्ये हृदयविकार, हृदयाच्या झडपांचे आजार आणि अनियमित हृदयाचे ठोके (अॅट्रियल फिबि—लेशन) यांचा समावेश आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे वेळेवर निदान होऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील.
19 व्या शतकात तयार झालेल्या पारंपरिक स्टेथोस्कोपचा वापर दोन शतकांपेक्षा अधिक काळापासून डॉक्टरांच्या तपासणीतील एक महत्त्वाचा भाग आहे. आता इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इम्पीरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टच्या संशोधकांनी यात एआय तंत्रज्ञान समाविष्ट करून एक नवीन उपकरण तयार केले आहे. हे उपकरण मानवी कानाला न ऐकू येणारे हृदयाचे ठोके आणि रक्ताच्या प्रवाहातील सूक्ष्म बदल ओळखते. त्याच वेळी ते रुग्णाचे ईसीजी रेकॉर्डिंगही घेते. हे तंत्रज्ञान लवकर निदान करण्यास मदत करते, जे हृदयविकार आणि इतर संबंधित आजारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक परिषदेत या शोधाची माहिती सादर करण्यात आली. परिषदेतील संशोधनानुसार, सुमारे 12000 रुग्णांवर या स्टेथोस्कोपचा वापर करून चाचणी घेण्यात आली. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थकवा येणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या चाचणीमध्ये, ज्या रुग्णांची तपासणी एआय स्टेथोस्कोप वापरून करण्यात आली, त्यांना हृदयविकाराचे निदान होण्याची शक्यता दुप्पट होती. तसेच, अॅट्रियल फिबि—लेशनचे निदान होण्याची शक्यता तिप्पट आणि हृदयाच्या झडपांच्या आजाराचे निदान होण्याची शक्यता जवळपास दुप्पट होती.
कॅलिफोर्नियास्थित ‘इको हेल्थ’ कंपनीने हे उपकरण तयार केले आहे, जे एका प्लेइंग कार्डच्या आकाराचे आहे. हे रुग्णाच्या छातीवर ठेवल्यानंतर हृदयाचे इलेक्ट्रिक सिग्नल आणि रक्तप्रवाहाचा आवाज रेकॉर्ड करते. ही माहिती क्लाऊडवर (ऑनलाईन डेटा स्टोरेज) पाठवली जाते, जिथे एआय अल्गोरिदमद्वारे त्याचे विश्लेषण होते. त्यानंतर, रुग्णाला धोका आहे की नाही, हे स्मार्टफोनवर दाखवले जाते. इम्पीरियल कॉलेजचे डॉ. पॅट्रिक बॅक्टिगर म्हणाले, ‘दोनशे वर्षांपासून स्टेथोस्कोपच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. परंतु, आता हे स्मार्ट स्टेथोस्कोप 15 सेकंदाच्या तपासणीत हृदयविकाराचे निदान देऊ शकते, हे अविश्वसनीय आहे.‘ या शोधाला बि—टिश हार्ट फाऊंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्चने (एनआयएचआर) निधी दिला आहे. हे तंत्रज्ञान लवकर निदान करून रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास मदत करेल, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र, याचा वापर केवळ संशयित रुग्णांसाठीच करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.