

बीजिंग : पृथ्वीच्या वरच्या वातावरणात लपलेल्या प्रचंड आणि अद़ृश्य ‘प्लाझ्मा बबल्स’चा शोध घेण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. हे नैसर्गिक अडथळे जीपीएस (GPS) प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि रेडिओ सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. परंतु, आतापर्यंत त्यांचा माग काढणे अत्यंत कठीण होते.
हे बुडबुडे, ज्यांना ‘इक्वेटोरियल प्लाझ्मा बबल्स’ ( EPBs) म्हणून ओळखले जाते, ते आयनोस्फिअरमध्ये आढळतात. आयनोस्फिअर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेला वातावरणाचा एक थर आहे, जिथे सौर किरणोत्सर्गामुळे बहुतेक वायू आयनीकृत होऊन प्लाझ्माच्या समुद्रात रूपांतरित होतात. हे बुडबुडे म्हणजे आयनोस्फिअरमधील पोकळी असतात, जसे स्विस चीजमधील छिद्रे. सूर्यास्तानंतर जेव्हा सूर्यप्रकाशाअभावी आयनीकरण अचानक थांबते, तेव्हा हे बुडबुडे तयार होतात. विशेष म्हणजे, ते फक्त ग्रहाच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ तयार होतात, जे भौगोलिक विषुववृत्तापेक्षा थोडे वेगळे आहे.
या प्लाझ्मा बबल्सचा आकार 10 ते 100 किलोमीटरपर्यंत असू शकतो. मात्र, ही प्लाझ्मा पोकळी उघड्या डोळ्यांना दिसत नसल्यामुळे, त्यांना अचूकपणे मोजणे आणि त्यांचा माग काढणे आतापर्यंत खूप कठीण ठरले आहे. हे बबल्स नेमके कुठे आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण, ते जीपीएस पोझिशनिंग सॉफ्टवेअरमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि दूर अंतरावर आयनोस्फिअरवरून परावर्तित होणारे रेडिओ सिग्नल खंडित करू शकतात. त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीत ते धोकादायक ठरू शकतात.
‘स्पेस वेदर’ या जर्नलमध्ये 9 मे रोजी प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, चीनच्या नॅशनल स्पेस सायन्स सेंटर आणि बीजिंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ‘एअरग्लो’ (Airglow) चे निरीक्षण करून EPBs शोधण्याचा एक नवीन मार्ग विकसित केला आहे. जेव्हा रात्रीच्या वेळी वरच्या आयनोस्फिअरमधील प्लाझ्मा थंड होतो आणि पुन्हा वायूंमध्ये रूपांतरित होतो, तेव्हा प्रकाशाच्या रूपात ऊर्जा उत्सर्जित होते. याच चमकदार प्रकाशाला ‘एअरग्लो’ म्हणतात. या प्रकाशाचे निरीक्षण करून आता या अद़ृश्य बुडबुड्यांचे स्थान निश्चित करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे दळणवळण आणि नेव्हिगेशन प्रणाली अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविण्यात मदत होईल.