

न्यूयॉर्क : टेक्सासमधील ‘बिग बेंड नॅशनल पार्क’मध्ये फेरफटका मारताना एका स्वयंसेवकाला एक अनोखी, मऊसर फुलाची वनस्पती दिसली. संशोधनानंतर हे फूल आतापर्यंत कधीही न पाहिले गेलेले नवीन प्रजातीचे असल्याचे समोर आले. संशोधकांनी या वनस्पतीला ‘वूली डेव्हिल’ असे नाव दिले असून ती सूर्यमुखी किंवा सूर्यफुलाच्या कुळामध्ये मोडते. विशेष म्हणजे, ही फक्त नवीन प्रजातीच नसून एक नवीन वनस्पती वंशदेखील आहे.
ही शोधलेली वनस्पती महत्त्वाची आहे. कारण, गेल्या 50 वर्षांत अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यानात प्रथमच नवीन वंश सापडला आहे. यापूर्वी 1976 मध्ये डेथ व्हॅली नॅशनल पार्क मध्ये ‘जुलाय गोल्ड’ नावाची झुडूप वनस्पती सापडली होती. कॅलिफोर्निया अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार हा शोध दर्शवतो की, मेक्सिको आणि अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागात पसरलेल्या चिहुआहुआन वाळवंटातील वनस्पती वैविध्य अद्याप संपूर्णपणे नोंदवले गेलेले नाही. मार्च 2024 मध्ये स्वयंसेवक डेब मॅनली यांनी वाळवंटातील खडकांच्या मधून उगवलेल्या या फुलांचे फोटो काढून iNaturalist या सायंटिफिक प्लॅटफॉर्मवर शेअर केले. या आंतरराष्ट्रीय समुदायातील वनस्पतिशास्त्रज्ञांनी त्यावर चर्चा केली आणि त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मॅनली व वैज्ञानिकांच्या चमूने या फुलांचा अभ्यास करून त्याचे डीएनए विश्लेषण केले. त्यांनी सुल रोस स्टेट युनिव्हर्सिटी (टेक्सास) आणि कॅलिफोर्निया अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ मधील ‘हर्बारिया’ मध्ये उपलब्ध वनस्पतींच्या नमुन्यांशी तुलना केली. संशोधनानुसार, या नवीन वनस्पतीचा समावेश सूर्यफुलाच्या कुळात केला जातो. ही माहिती ‘फायटोकीज’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.