

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या डार्क एनर्जी कॅमेराने अलीकडे टिपलेला एक थरारक फोटो आपल्या समोर एका अद्भुत खगोलीय घटनेचे द़ृश्य उलगडतो, प्रकाश आणि अंधार यांच्यात सुरू असलेली एक अंतराळातील लढाई! ही लढाई सर्किनस नक्षत्रात, पृथ्वीपासून सुमारे 2,500 प्रकाशवर्ष दूर घडते आहे. त्याच्या केंद्रस्थानी दिसणारी भीषण काळसर रचना म्हणजे Circinus West molecular cloud एका विशाल वायू आणि धूळ यांच्या ढगाचा समूह, जो नव्या तार्यांच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. हे ढग इतके दाट आहेत की, त्यातून प्रकाशही आरपार जाऊ शकत नाही, म्हणूनच यांना ‘डार्क नेब्युला’ असेही म्हणतात.
हा अंधारा ढग सुमारे 180 प्रकाशवर्षांपर्यंत पसरलेला असून, त्यात 2.5 लाख सूर्यांइतकी वस्तुमान सामग्री आहे. या दाट आणि थंड वायूमध्ये अंधार कायमचा राहू शकत नाही. कारण, हाच भाग एका सक्रिय ‘तारक-जन्मशाळे’सारखा कार्यरत आहे. इथे गॅस स्वतःच्या गुरुत्वाने आकुंचन पावतो आणि नव्याने तारे जन्म घेतात. या फोटोमध्ये तुम्ही लहान, उजळ चमकणार्या बिंदूंमध्ये हे नवजात तारे पाहू शकता, जे आपल्या आयनीकृत ऊर्जेच्या प्रचंड जेटस्मधून अंधारात उजेड पसरवत आहेत. या ढगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दिसणारा नारिंगी तेजस्वी झोत म्हणजे त्या दूरवर असलेल्या असंख्य तार्यांचा प्रकाश. ही रोमांचक प्रतिमा चिलीमधील सेरो टोलोलो इंटर-अमेरिकन वेधशाळेवर बसवलेल्या डार्क एनर्जी कॅमेराने टिपली आहे, जगातील सर्वात शक्तिशाली डिजिटल कॅमेरांपैकी एक. अधिक झूम केल्यावर या ढगात दिसतात काही Herbig- Haro ऑब्जेक्टस्, म्हणजेच ते विचित्र प्रकाशाचे जे खिसे आहेत, जेव्हा नवजात तार्यांकडून सोडलेला वेगवान वायू आसपासच्या मंदगती वायूमध्ये आदळतो आणि त्यातून प्रचंड उष्णता व ऊर्जा निर्माण होते. हे गॅस जेटस् रंगीबेरंगी, तलवारीसारखे दिसतात, एक लहान आकाशीय लाईटसाबरच जणू! Annotated प्रतिमेमध्ये यापैकी अनेक जेटस् हायलाईट करून दाखवले आहेत.