

लंडन : दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या घनदाट वर्षावनात शास्त्रज्ञांनी ‘हाऊलर माकडां’च्या दोन पूर्णपणे नवीन आणि आकर्षक प्रजातींचा शोध लावला आहे. या शोधाने या प्राण्यांच्या उत्क्रांतीचा वृक्ष नव्याने रेखाटला गेला असला, तरी दुर्दैवाने या दोन्ही प्रजाती शोध लागताच नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या नव्या प्रजातींना ‘अलौआटा इरोई’ आणि ‘अलौआटा माटोग्रोसेन्सिस’ अशी नावे देण्यात आली आहेत. दाट दाढी, निरागस भाव आणि चमकदार लाल रंगाची फर हे या माकडांचे खास वैशिष्ट्य आहे. जनुकीय विश्लेषणातून लागलेल्या या शोधामुळे आता जगातील हाऊलर माकडांच्या ज्ञात प्रजातींची संख्या १६ वर पोहोचली आहे.
अस्तित्वावर गंभीर संकट
या नव्या शोधामुळे आनंद व्यक्त होत असतानाच शास्त्रज्ञांनी मोठी चिंताही व्यक्त केली आहे. यातील ‘ए. माटोग्रोसेन्सिस’ ही प्रजाती आधीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, तर दुसऱ्या प्रजातीला रिओ ब्रँको नदीवर प्रस्तावित असलेल्या धरणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वाढती जंगलतोड आणि हवामान बदलामुळे अनेक प्रजातींचा अभ्यास होण्यापूर्वीच त्या नष्ट होत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
नद्यांमुळे झालेली स्वतंत्र उत्क्रांती
स्वीडनच्या गोथेनबर्ग युनिव्हर्सिटीच्या प्रमुख लेखिका रोमिना बतिस्ता आणि ब्रिटनच्या सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जीन बूबली यांच्या पथकाने ११ प्रजातींच्या डीएनएचा अभ्यास केला. यातून असे समोर आले की, अॅमेझॉन, झिंगू आणि ब्रँको यांसारख्या मोठ्या नद्यांनी नैसर्गिक अडथळ्याचे काम केले. ही माकडे छोटे प्रवाह पोहून पार करू शकतात, परंतु मोठ्या नद्या पार करता न आल्याने त्यांचे गट वेगळे राहिले आणि त्यातून स्वतंत्र प्रजातींची उत्क्रांती झाली.