

सान अॅन्टोनियो : हवामान बदलामुळे एकमेकांच्या प्रदेशात येऊ लागलेल्या दोन पक्ष्यांच्या प्रजातींच्या संकरातून एका नवीन पक्ष्याचा जन्म झाला आहे. टेक्सास विद्यापीठातील संशोधकांना हा नवीन पक्षी सान अॅन्टोनियोमध्ये सापडला असून, हा पक्षी निळ्या (Blue Jay) आणि हिरव्या जय (Green Jay) पक्ष्यांच्या संकरातून जन्माला आल्याचे मानले जाते.
टेक्सास विद्यापीठातील संशोधक ब्रायन स्टोक्स यांनी सांगितले की, ‘हे शक्य आहे असे आम्हाला कधीच वाटले नव्हते.‘ जरी या दोन प्रजातींची नावे सारखी असली, तरी त्या एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत आणि सामान्यतः त्या एकाच प्रदेशात आढळत नाहीत. या शोधाबाबतचा अहवाल स्टोक्स आणि त्यांचे प्राध्यापक टिम किट यांनी ‘इकोलॉजी अँड इव्होल्यूशन’ या मासिकात प्रकाशित केला आहे. मे 2023 च्या शेवटी एका स्थानिक पक्षी निरीक्षकाला युनिव्हर्सल सिटीमधील तिच्या अंगणात हा असामान्य पक्षी पहिल्यांदा दिसला.
स्टोक्स म्हणाले, ‘तिने फेसबुक ग्रुपमध्ये काही अस्पष्ट फोटो पोस्ट केले होते आणि हा पक्षी कोणता आहे, हे शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.’ फोटो पाहताच, स्टोक्स यांना लगेचच तो संकरित पक्षी असावा, असा अंदाज आला. या पक्ष्याचा निळा रंग नेहमीच्या ब्लू जेपेक्षा वेगळा होता आणि त्याच्या गळ्यावरील काळा रंग व मुखवट्यासारखा आकार ग्रीन जे पक्ष्यासारखा होता. त्यांनी सांगितले की, सान अॅन्टोनियोमध्ये ग्रीन जे पक्षी सापडणे अनपेक्षित आहे, कारण ते मेक्सिकोमध्ये सामान्य असले तरी, अमेरिकेत ते सहसा टेक्सासच्या फक्त दक्षिणेकडील भागातच आढळतात.
हा पक्षी जवळून पाहण्यासाठी त्या महिलेने स्टोक्स यांना तिच्या घरी बोलावले. त्यांनी तीन दिवस तिच्या अंगणात पक्ष्याला पकडण्यासाठी वाट पाहिली. सुरुवातीला तो त्यांच्या जाळ्यातून निसटला, परंतु तिसर्या दिवशी तो चुकून जाळ्यात अडकला. स्टोक्स यांनी त्या पक्ष्याचा रक्ताचा नमुना घेतला, त्याच्या पायात ओळख पटवण्यासाठी एक बँड लावला आणि त्याला सोडून दिले. त्यानंतर स्टोक्स आणि किट यांनी त्या रक्ताच्या नमुन्यातून डीएनए (DNA) वेगळा केला आणि त्याची तपासणी केली. तपासणीनंतर स्टोक्स यांचा संशय खरा ठरला, हा पक्षी मादी ग्रीन जय आणि नर ब्लू जय यांच्या संकरातून जन्माला आला होता. संशोधकांनी या संकरित पक्ष्याच्या प्रजातीला अजून कोणतेही नाव दिलेले नाही.