

न्यूयॉर्क : एका संशोधकाने दक्षिण अमेरिकेतील विंचवांची अशी पहिली प्रजाती शोधली आहे जी आपले विष फवारू शकते. अशी क्षमता किंवा वर्तन असलेल्या दोन प्रजाती यापूर्वी उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेत आढळलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे विंचू आपल्या शेपटीतील नांगीने डंख मारत असतो.
विंचवांच्या जगभरात अडीच हजारपेक्षाही अधिक प्रजाती आढळतात. भक्ष्याला पकडण्यासाठी किंवा शिकार्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना असा डंख उपयुक्त ठरत असतो. त्यांच्या शेपटीच्या टोकाला अशी विषाची थैली असते. तिला ‘टेल्सन’ असे म्हणतात. या टेल्सनलाच एक टोकदार नांगी असते. या नांगीतून विष शरीरात सोडले जात असते. आता दक्षिण अमेरिकेतील विंचवांच्या प्रजातींपैकी एका प्रजातीमध्ये प्रत्यक्ष डंख न मारता दूरवरूनच विष फवारणारी ही प्रजाती आढळली आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘झुलॉजिकल जर्नल ऑफ द लिनियन सोसायटी’मध्ये देण्यात आली आहे. या नव्या प्रजातीला ‘टायटस अॅचिलीस’ असे नाव देण्यात आले आहे. कोलंबियामध्ये मॅग्देलेना वर्षावनाच्या डोंगराळ भागात ही नवी प्रजाती आढळून आली.
जर्मनीच्या म्युनिचमधील लुडविग मॅक्सीमिलीयन युनिव्हर्सिटीतील लिओ लॅबोरिक्स या विद्यार्थी संशोधकाने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की विष फवारणे ही खरे तर खर्चिक रणनीती आहे. काही दुर्मीळ प्रसंगीच ते फायदेशीर ठरू शकते. काही सापही अशा प्रकारे विषाचा स्प्रे फवारू शकतात. टी. अॅचिलिस या विंचवांना विष फवारताही येते आणि डंखही मारता येतो. डंख मारून थेट विष सोडले तर ते समोरच्या जीवाच्या शरीरात गेल्याची खात्री असते; मात्र तसे करण्यात काही शारीरिक धोकेही असतात. समोरचा जीव स्वसंरक्षणासाठी काही प्रतिकार करू शकतो. त्या तुलनेत विष फवारणे हे कमी धोक्याचे असते. मात्र ते टार्गेटपर्यंत जाईल की नाही व त्याचा परिणाम होईल की नाही याची खात्री नसते. मात्र शिकार्यांना चकवून तेथून पळ काढण्यासाठी ते पुरेसे ठरू शकते.