

लंडन : कर्करोगावर मात करण्यासाठी आणि उपचारांमुळे होणारे प्रतिकारशक्तीचे गंभीर दुष्परिणाम कमी करण्यासाठी, जागतिक स्तरावरील तज्ज्ञांनी नवीन आणि सुधारित ‘नैसर्गिक किलर पेशी’ विकसित केल्या आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) च्या संशोधकांनी कर्करोगाच्या गाठी असलेल्या उंदरांमध्ये CAR- NK पेशी (नैसर्गिक किलर पेशींचे जनुकीय सुधारित रूप) इंजेक्ट केल्या. नैसर्गिक किलर पेशी (NK cells) प्रतिकारशक्ती प्रणालीमध्ये आढळतात आणि विशिष्ट धोक्यांना ओळखण्याचे ‘प्रशिक्षण’ न घेताही बाह्य घटकांना नष्ट करतात.
कर्करोगाच्या उपचारात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या CAR-T पेशींप्रमाणेच, CAR- NK पेशी कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी जनुकीयद़ृष्ट्या तयार केल्या जातात. मात्र, CAR- NK पेशींना रुग्णाच्या प्रतिकारशक्ती प्रणालीद्वारे नाकारण्याचा धोका असतो. त्यामुळे बोस्टन-आधारित संशोधकांनी हा धोका टाळण्यासाठी CAR- NK पेशींची एक नवीन मालिका तयार केली.
संशोधकांच्या पथकाने सांगितले की, जर NK पेशींना अशा प्रकारे ‘शांत’ करण्यासाठी सुधारित केले गेले, ज्यामुळे T पेशी (प्रतिकारशक्ती प्रणालीतील पेशी, ज्या अनोळखी घटकांवर हल्ला करतात) त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत, तर त्या T पेशींच्या शोध घेण्याच्या प्रक्रियेतून सुटू शकतात. जेव्हा उंदरांना या सुधारित CAR- NK पेशी देण्यात आल्या, तेव्हा त्या त्यांच्या शरीरात तीन आठवड्यांपर्यंत टिकून राहिल्या आणि कर्करोग जवळजवळ पूर्णपणे नष्ट करू शकल्या. याउलट, ज्या उंदरांना नैसर्गिक NK पेशी किंवा मानक CAR-NK पेशी मिळाल्या, त्यांच्या शरीरातील त्या पेशी दोन आठवड्यांच्या आत कमी झाल्या आणि कर्करोग अनियंत्रित राहिला.
संशोधकांनी हे देखील नमूद केले की, या नवीन CAR- NK पेशींमुळे मानक CAR-T पेशी थेरपीच्या तुलनेत सायटोकाईन रीलिज सिंड्रोम होण्याची शक्यता कमी आहे. हा केमोथेरपीचा एक दुष्परिणाम आहे, ज्यामुळे शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ शकतात. या जनुकीय सुधारणेसाठी केवळ एक अतिरिक्त पायरी लागते, ज्यामुळे ‘रेडी-टू-यूज’ उअठ-छघ पेशी विकसित करणे सोपे होईल, असा विश्वास संशोधकांना आहे. यामुळे कर्करोगाचे निदान होताच रुग्णांना त्वरित उपचार देणे शक्य होईल.