

लिमा : जीवशास्त्रज्ञांनी पेरूमधील रियो अबिसेओ राष्ट्रीय उद्यानात माऊस ऑपोसम या लहान सस्तन प्राण्याची एक नवीन प्रजाती शोधली आहे. या प्राण्याचे शास्त्रीय नाव ‘मार्मोसा चाचापॉया’ (चरीोीर लहरलहरिेूर) असे ठेवण्यात आले आहे. कॅल पॉली हम्बोल्टच्या जीवशास्त्रज्ञ सिल्व्हिया पवन यांच्या नेतृत्वाखालील पथक 2018 मध्ये एका दुर्मीळ खार प्रजातीचा शोध घेत असताना, त्यांना चुकून यापूर्वी अज्ञात असलेला हा लहान सस्तन प्राणी दिसला.
या प्राण्याने ओळखल्या गेलेल्या इतर ऑपोसम्सपेक्षा खूप उंच ठिकाणी, सुमारे 2,664 मीटर (8,740 फूट) उंचीवर अधिवास केला होता. हा लहान ऑपोसम फक्त चार इंच (10 सें. मी.) लांबीचा आहे आणि त्याच्या चेहर्यावरील विशिष्ट खुणांमुळे तो सहज ओळखता येतो. या प्राण्याचा डीएनए अभ्यास, रचनात्मक विश्लेषण आणि जगभरातील संग्रहालयांमधील नमुन्यांशी तुलना करून, जीवशास्त्रज्ञांनी त्याची नवीन प्रजाती म्हणून नोंदणी केली. हा शोध अमेरिकन म्युझियम नोव्हिटेटस् या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
या नवीन प्रजातीला उत्तर पेरूचे मूळ रहिवासी असलेल्या चाचापॉया लोकांच्या सन्मानार्थ ‘मार्मोसा चाचापॉया’ असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रजातीचा फक्त एकच नमुना गोळा करण्यात आला आहे, त्यामुळे त्याचे वितरण क्षेत्र किंवा वर्तन याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या शोधातून हे स्पष्ट होते की, ‘रियो अबिसेओ’ राष्ट्रीय उद्यान हे ‘पिवळ्या शेपटीचा वूली माकड’ सारख्या अनेक दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींसाठी एक महत्त्वाचे आश्रयस्थान आहे, आणि त्याचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे. पृथ्वीवरील अज्ञात वन्यजीवनाचे रहस्य उलगडण्यासाठी अशा दुर्गम परिसरांचे शोध आणि संवर्धन महत्त्वाचे आहे, ज्यामुळे भविष्यात आणखी काही अनोख्या प्रजातींचा शोध लागण्याची आशा आहे.