New Monkey Species | काँगोच्या जंगलात नारंगी ओठ असणारी माकडाची नवीन प्रजाती!

 New Monkey Species |
New Monkey Species | काँगोच्या जंगलात नारंगी ओठ असणारी माकडाची नवीन प्रजाती!
Published on
Updated on

किन्शासा : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील एका दुर्गम भागात शास्त्रज्ञांनी माकडाच्या एका अत्यंत दुर्मीळ आणि नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या माकडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे ओठ गडद संत्र्यासारख्या म्हणजेच नारंगी रंगाचे आहेत. तसेच, हे माकड इतर माकडांपेक्षा वेगळ्या पद्धतीने ‘गर्जना’ करते आणि विचित्र फुरफुरण्याचा आवाज काढते.

गेल्या ७५ वर्षांत आफ्रिका खंडात शोधली गेलेली माकडाची ही केवळ पाचवी नवीन प्रजाती आहे. ‘द फॉरेस्ट कलेक्टिव्ह' या संस्थेचे अध्यक्ष आणि मानववंशशास्त्रज्ञ जोशुआ लिंडर यांनी सांगितले की, ‘‘आजच्या काळात प्राइमेटस्‌ म्हणजेच मानवाच्या जवळ असणाऱ्या प्राण्यांची नवीन प्रजाती शोधणे अत्यंत दुर्मीळ आहे, त्यातही एवढ्या मोठ्या आकाराचे माकड सापडणे ही खरोखरच अद्भु‌त गोष्ट आहे.’’ शास्त्रज्ञांनी या नवीन प्रजातीचे वैज्ञानिक नाव ‘कोलोबस काँगोएन्सिस' (Colobus congoensis) असे ठेवले आहे. तर स्थानिक ‘किलंगा’ (Kilanga) भाषेत या माकडाला ‘लिक्वेली' (Likweli) या नावाने ओळखले जाते.

संशोधकांच्या मते, या घनदाट जंगलांमध्ये अजूनही माकडांच्या इतर अनेक अज्ञात प्रजाती असू शकतात. या गूढ माकडाचा शोध घेण्याचा प्रवास खूप रंजक आहे: २००८ : काँगोमधील ‘लोमामी नॅशनल पार्क’च्या घनदाट जंगलात वन्यजीव संरक्षणवाद्यांना पहिल्यांदा या माकडाचा एक अंधुक फोटो मिळाला होता. २०१८ : तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅमेऱ्यात अशाच एका माकडाची स्पष्ट छबी टिपली गेली. संशोधन: यानंतर ‘फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटी’चे शास्त्रज्ञ जुनियर आंबोको यांनी या माकडाचा शोध घेण्याचे ठरवले. संशोधक जुनियर आंबोको आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या माकडाचे फोटो घेऊन जंगलाभोवतालच्या ५२ गावांना भेटी दिल्या.

तेथील लोकांना जंगलातील प्राणी आणि वनस्पतींची खडान्खडा माहिती असते. ‘‘आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ५२ पैकी केवळ ८ गावांतील लोकांनाच या माकडाबद्दल माहिती होती. जे शिकारी प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात फिरतात, त्यांनाही या माकडाबद्दल फारशी माहिती नव्हती. यावरूनच हे माकड किती दुर्मीळ आणि रहस्यमय आहे, याचा अंदाज येतो,’’ असे आंबोको यांनी सांगितले. या नवीन शोधामुळे आफ्रिकेतील जैविक विविधतेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना एक नवीन दिशा मिळाली असून, या प्रजातीचे संवर्धन करण्याचे मोठे आव्हान आता शास्त्रज्ञांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news