Magnetoelastic Tent | नवा ‘मॅग्नेटोईलास्टिक’ तंबू हालचाल, वारा, आवाजापासून बनवणार वीज

लहान उपकरणांना मिळणार ऊर्जा
Magnetoelastic Tent |
Magnetoelastic Tent | नवा ‘मॅग्नेटोईलास्टिक’ तंबू हालचाल, वारा, आवाजापासून बनवणार वीज
Published on
Updated on

लंडनः संशोधकांनी एका अशा अनोख्या तंबूचा शोध लावला आहे, जो स्वतःच्याच हालचालींमधून किंवा वाऱ्यापासून विजेची निर्मिती करतो. ही प्रगत तंत्रज्ञान प्रणाली भविष्यात आपत्तीग्रस्त भाग, लष्करी छावण्या आणि दुर्गम (ऑफ-ग्रिड) भागांतील तंबूंमध्ये लहान उपकरणांना वीज पुरवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते.

या तंत्रज्ञानामागील मुख्य आधार ‘मॅग्नेटोईलास्टिसिटी’ हा भौतिक गुणधर्म आहे. १८६५ मध्ये भौतिकशास्त्रज्ञ एमिलिओ व्हिलारी यांनी या संकल्पनेचा शोध लावला होता. सोप्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या विशिष्ट घटकावर बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत दाब किंवा ताण आल्यास, त्याच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतो आणि त्याचे विजेमध्ये रूपांतर होते. ‘मॅटर’ या प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, या तंबूच्या निर्मितीसाठी ‘स्मार्ट टेक्सटाईल’च्या स्तरांचा वापर करण्यात आला आहे.

तंबूच्या आत आणि बाहेर होणाऱ्या दैनंदिन हालचालींवर हे कापड प्रतिक्रिया देते : नैसर्गिक व शारीरिक हालचाली : वाहणारा वारा, तंबूच्या आत व्यक्तीची होणारी हालचाल किंवा तंबू उभारताना कापडावर येणारा ताण – या सर्वांचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. विशेष रचना : तंबूच्या जमिनीवरील भागात ‘मॅग्नेटोईलास्टिक रिबन्स’ बसवण्यात आल्या आहेत. तर तंबूचे छत वाहक तंतू आणि मॅग्नेटोईलास्टिक फिल्मच्या विशेष स्तरांनी तयार केले आहे. जेव्हा हे कापड वळते किंवा ताणले जाते, तेव्हा त्यात निर्माण होणारा चुंबकीय बदल इंडक्शन प्रक्रियेद्वारे विजेमध्ये रूपांतरित होतो.

संशोधनादरम्यान असे दिसून आले की, या कापडाच्या एका लहान नमुन्यावर हाताने हलकी थाप मारली असता, अवघ्या १.५ सेकंदात ०.२२-मायक्रोफॅराडचा कॅपॅसिटर ५.८ व्होल्टपर्यंत चार्ज झाला. जरी ही वीज स्मार्टफोनसारखे मोठे उपकरण चार्ज करण्यासाठी थेट पुरेशी नसली, तरी अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, हे कापड मानवी हालचाली, आवाज आणि हवेचा दाब यांसारख्या मेकॅनिकल ऊर्जेचे रूपांतर विजेत करू शकते. तसेच, मोठ्या आकाराच्या तंबूच्या कापडातून जास्त प्रमाणात ऊर्जा गोळा करणे शक्य आहे. ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नाही किंवा वीजपुरवठा अत्यंत अनिश्चित आहे, अशा ठिकाणी LED लाईटस्‌ लावणे, फोन चार्ज करणे किंवा छोटे हिटर चालवणे यांसारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हे तंबू अत्यंत उपयुक्त ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news