

लंडन : सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी, आजच्या कोलोरॅडोच्या प्राचीन पूरमैदानात कुत्र्याच्या आकाराचा एक रहस्यमयी डायनासोर धावत असे, असा खुलासा एका नवीन अभ्यासात झाला आहे. या दोन पायांच्या शाकाहारी डायनासोरच्या शोधामुळे जुरासिक काळातील इतर अनेक प्रजातींबद्दलच्या शास्त्रज्ञांच्या समजुतींना मोठे आव्हान मिळाले आहे.
या नव्या प्रजातीला ‘एनिग्माकर्सर मॉलीबोर्थविके’ (Enigmacursor mollyborthwickae) असे नाव देण्यात आले आहे. त्याची लांबी सुमारे 3 फूट (1 मीटर) आणि उंची 1.5 फूट (0.5 मीटर) होती. त्याच्या लहान आकारामुळे, या शोधाने जुरासिक काळातील डायनासोरच्या जगाबद्दलच्या आपल्या ज्ञानात मोठी भर पडली आहे. एका खासगी जीवाश्म कंपनीने 2021 ते 2022 दरम्यान कोलोरॅडोमध्ये ‘ए. मॉलीबोर्थविके’चे उत्खनन केले. त्यानंतर हा सांगाडा ‘नॅनोसौरस’ (Nanosaurus) नावाच्या, त्याच खडकात आढळणार्या दुसर्या एका लहान डायनासोरचा असल्याचे सांगून विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
लंडनच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाने हा सांगाडा विकत घेतल्यानंतर संशोधकांनी त्यावर अभ्यास सुरू केला. तेव्हा त्यांना आढळले की, हा केवळ ‘नॅनोसौरस’ नाही, तर एक पूर्णपणे नवीन प्रजाती आहे. इतकेच नव्हे, तर या शोधामुळे ‘नॅनोसौरस’ आणि ‘मॉरिसन फॉर्मेशन’ (Morrison Formation) नावाच्या खडकात सापडलेल्या इतर अनेक लहान डायनासोरचे वैज्ञानिक वर्गीकरणदेखील अविश्वसनीय असल्याचे समोर आले आहे.
‘मॉरिसन फॉर्मेशन’ हे ‘स्टेगोसौरस’ (Stegosaurus) आणि ‘अॅलोसौरस’ (Allosaurus) सारख्या महाकाय आणि भयंकर डायनासोरच्या जीवाश्मांसाठी जगप्रसिद्ध आहे. ‘एनिग्माकर्सर’ हा लहान डायनासोर याच महाकाय प्राण्यांसोबत जुरासिक काळात (20.13 कोटी ते 14.5 कोटी वर्षांपूर्वी) वावरत होता. रॉयल सोसायटी ओपन सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, या प्रदेशातील लहान डायनासोरबद्दल शास्त्रज्ञांना अजून बरेच काही शिकायचे आहे.