

कॅलिफोर्निया : पृथ्वीवरील कार्बन चक्रातील बदलामुळे पुढील 1 लाख वर्षांत नवीन हिमयुग (आईस एज) येऊ शकते, असा इशारा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, रिव्हरसाईडचे शास्त्रज्ञ डॉ. डॉमिनिक हुल्से आणि अँडी रिडगवेल यांनी दिला आहे. त्यांच्या संशोधनात असे सांगितले आहे की, पृथ्वीचा थर्मोस्टॅट किंवा नैसर्गिक तापमान संतुलन अचानक बिघडल्यास हवामान अचानक थंड होऊ शकते.
शास्त्रज्ञांच्या मते, समुद्रातील प्लँकटन निर्मित कार्बन जमिनीखाली गाडले जाण्याच्या प्रक्रियेमुळे हे संभाव्य आहे. प्लँकटनच्या मृत्यूनंतर त्यांचा कार्बन समुद्राच्या तळाशी जाऊन जमिनीत साठवला जातो. समुद्रातील फॉस्फरस आणि ऑक्सिजनच्या प्रमाणामुळे या प्रक्रियेत बदल होतो. जास्त कार्बनडायऑक्साईडच्या (CO2) उत्सर्जनामुळे समुद्रात अधिक प्लँकटन निर्माण होते, जे ऑक्सिजन कमी करतात आणि कार्बन अधिक प्रमाणात जमिनीत साठतो. यामुळे पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागते.
रिडगवेल म्हणाले, ही प्रतिक्रिया-चक्रे पृथ्वीच्या हवामानाचे संतुलन साधण्याऐवजी ओलांडतात आणि पृथ्वीच्या तापमानाला हळूहळू कमी करतात. जर आजचा वातावरणीय कार्बनडायऑक्साईडचा स्तर लक्षात घेतला, तर पृथ्वी पुढील हिमयुगाच्या प्रारंभासाठी एकप्रकारे सज्ज होत आहे.
संशोधनानुसार, या प्रक्रियेमुळे भविष्यातील हिमयुगाचे तापमान मागील हिमयुगापेक्षाही खूप कमी असू शकते. तथापि, शास्त्रज्ञांनी नमूद केले की, हे परिवर्तन इतक्या वर्षांनी होणार आहे की, आपल्याला याचा थेट परिणाम या जीवनात जाणवणार नाही. रिडगवेल यांनी सांगितले, सध्या हवामानातील वाढ थांबवणे अधिक महत्त्वाचे आहे. पृथ्वी अखेर थंड होईल, पण ते आपल्यासाठी त्वरित फायदेशीर ठरणार नाही. हा संशोधनाचा निष्कर्ष ‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून पृथ्वीवरील कार्बन चक्र आणि हवामान बदल यातील जटिल संबंध समजून घेण्यास महत्त्वाचे ठरतो.