

वॉशिंग्टन : ‘स्पेसएक्स’चे एलन मस्क आणि ‘ब्ल्यू ओरिजिन’चे जेफ बेजोस या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील अंतराळ स्पर्धा आता आणखी तीव्र झाली आहे. बेजोस यांच्या ‘ब्ल्यू ओरिजिन’ कंपनीने आपल्या विशाल ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून त्याची पहिली चाचणी पार पाडली आहे. फ्लोरिडाच्या ऐतिहासिक लाँच पॅडवरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. पृथ्वीच्या कक्षेत सॅटेलाईटस् सोडणे आणि भविष्यात अंतराळवीर असलेले यान अवकाशात घेऊन जाणे यासाठी हे रॉकेट डिझाईन करण्यात आले आहे. ‘एलन मस्क’ यांच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील दबदब्याला शह देण्यासाठी बेजोस यांचे प्रयत्न सुरू आहेत.
‘टेस्ला’ आणि ‘एक्स’सारख्या बड्या कंपन्यांचे सर्वेसर्वा असलेल्या एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वतःचे मजबूत स्थान बनवले आहे. या कंपनीचे ‘फाल्कन-9’ हे रॉकेट ‘नासा’कडूनही वापरले जात आहे. ‘अॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेजोस यांची ‘ब्ल्यू ओरिजिन’ ही कंपनी ‘स्पेसएक्स’शी स्पर्धा करते. या कंपनीने 320 फूट उंचीचे विशाल रॉकेट विकसित केले आहे. या रॉकेटने आता एका प्रोटोटाईप सॅटेलाईटला घेऊन उड्डाण केले. या प्रक्षेपणावेळी रॉकेटचा पहिला टप्पा अटलांटिक महासागरात एक बार्जवर उतरण्यात चुकला, पण त्याचे प्राथमिक लक्ष्य उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत नेऊन सोडणे हे होते, ज्यामध्ये यश मिळाले. या मोहिमेचा एकूण वेळ सहा तासांचा होता आणि त्याच्या दुसर्या टप्प्याला सुरक्षित कक्षेत स्थिर करण्यात आले. ब्ल्यू ओरिजिनच्या टीमने हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. या लाँचमध्ये काही विलंब लागला, कारण पाईपलाईनमध्ये बर्फ तयार झाल्याची समस्या आली होती. त्यानंतरही लाँचवेळी न्यू ग्लेनने आपल्या शानदार प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले. अर्थात बूस्टर रीसायकलिंगमधील असफलता एक आव्हान मानली जाऊ शकते. मात्र कंपनीने हा केवळ एक परीक्षणाचा भाग होता असे म्हटले आहे. ब्ल्यू ओरिजिनचे लाँच अनाऊंसर एरियेन कॉर्नेल यांनी हा एक शानदार दिवस असल्याचे सांगितले. कंपनीचे प्राथमिक लक्ष्य सॅटेलाईटला कक्षेत पोहोचवणे हे होते व ते यशस्वी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वतः जेफ बेजोस या प्रक्षेपणावेळी उपस्थित होते.