New Dwarf Planet Discovery | सौरमालेत प्लुटोच्या पलीकडे नवीन बटुग्रहाचा शोध

‘प्लॅनेट नाईन’च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
new-dwarf-planet-discovered-beyond-pluto-in-solar-system
New Dwarf Planet Discovery | सौरमालेत प्लुटोच्या पलीकडे नवीन बटुग्रहाचा शोधPudhari File Photo
Published on
Updated on

टोकियो : आपल्या सूर्यमालेत प्लुटोच्याही पलीकडे एका नवीन संभाव्य बटुग्रहाचा शोध लागला आहे, ज्यामुळे खगोलविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोधामुळे सूर्यमालेत एक अज्ञात नववा ग्रह ( Planet Nine) अस्तित्वात असल्याच्या लोकप्रिय सिद्धांतावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मार्च 2023 मध्ये हवाई येथील जपानच्या सुबारू दुर्बिणीद्वारे या खगोलीय वस्तूची पहिल्यांदा नोंद घेण्यात आली. या वस्तूला ‘2023 KQ14’ असे शास्त्रीय नाव देण्यात आले असून, तिला ‘अमोनाईट’ असे आकर्षक टोपण नावही मिळाले आहे. जपानमधील संशोधकांच्या नेतृत्वाखालील पथकाने 14 जुलै रोजी ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये आपला शोधनिबंध प्रसिद्ध करून ही घोषणा केली. या बटुग्रहाला ‘अमोनाईट’ हे नाव देण्यामागेही एक विशेष कारण आहे. ‘फॉर्मेशन ऑफ द आऊटर सोलर सिस्टीम : अ‍ॅन आयसी लेगसी’ (FOSSIL) नावाच्या सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत हा शोध लागला आहे. ‘FOSSIL’ या शब्दाचा अर्थ जीवाश्म असल्याने, एका प्राचीन सागरी जीवाच्या जीवाश्मावरून त्याला ‘अमोनाईट’ असे नाव देण्यात आले.

‘प्लॅनेट नाईन’च्या सिद्धांताला धक्का

2016 मध्ये मांडण्यात आलेल्या ‘प्लॅनेट नाईन’च्या सिद्धांतानुसार, सूर्यमालेत नेपच्यूनच्या आकाराचा एक मोठा ग्रह अस्तित्वात असू शकतो. हा ग्रह नेपच्यूनपेक्षा 20 ते 30 पट दूरवरून सूर्याची परिक्रमा करत असावा, असे मानले जाते. या संभाव्य ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळेच ‘क्युपर बेल्ट’मधील लहान खगोलीय वस्तूंच्या कक्षा विचित्र आणि एकाच दिशेला झुकलेल्या आहेत, असा शास्त्रज्ञांचा तर्क होता. मात्र, ‘अमोनाईट’च्या कक्षेचा अभ्यास केल्यानंतर हा सिद्धांत कमकुवत होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तैवानमधील अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स संस्थेचे संशोधक आणि या शोधनिबंधाचे सह-लेखक शियांग-यू वांग यांनी सांगितले की, ‘प्लॅनेट नाईनची परिकल्पना यावर आधारित आहे की, आतापर्यंत ज्ञात असलेले सर्व सेडनॉईडस् सूर्यमालेच्या एकाच बाजूला कक्षेत फिरतात. मात्र, ‘अमोनाईट’च्या कक्षेमुळे या क्लस्टरिंगमागे ‘प्लॅनेट नाईन’ व्यतिरिक्त दुसरे काही कारण असू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.’

काय आहे ’अमोनाईट’ची ओळख?

‘अमोनाईट’ला ‘सेडनॉईड’ (Sednoid) म्हणून वर्गीकृत केले आहे. सेडनॉईड म्हणजे नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे अत्यंत विचित्र आणि लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरणारी खगोलीय वस्तू. आतापर्यंत शोध लागलेला हा चौथा सेडनॉईड आहे. हे नाव 2004 मध्ये शोध लागलेल्या ‘सेडना’ या बटुग्रहावरून आले आहे, जो सूर्यमालेच्या अगदी टोकावर अस्तित्वात आहे. खगोलशास्त्रज्ञ ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी ‘खगोलशास्त्रीय एकक’ (Astronomical Unit - AU) वापरतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर म्हणजे 1 AU. ‘सेडना’ सूर्याच्या सर्वात जवळ असताना 76 AU आणि सर्वात दूर असताना 900 AU अंतरावर असतो. याउलट, ‘अमोनाईट’ सूर्यापासून जवळ असताना 66 AU आणि दूर असताना 252 AU अंतरावर असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news