

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी दूरवरच्या आकाशगंगांचा एक नवीन आणि अत्यंत स्पष्ट नकाशा तयार केला आहे. हा नकाशा विश्वातील सर्वात रहस्यमयी घटक असलेल्या ‘डार्क मॅटर’ला समजून घेण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हेच डार्क मॅटर संपूर्ण ब्रह्मांडाला एका सूत्रात बांधून ठेवण्याचे काम करते.
‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हा नकाशा तयार केला असून, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अचूक नकाशा मानला जात आहे. जुन्या हबल टेलिस्कोपच्या तुलनेत हा नकाशा दोन पटीने जास्त स्पष्ट आहे, ज्यामुळे अंतराळातील अत्यंत पुसट गोष्टीही आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. यामध्ये गेल्या 10 अब्ज वर्षांतील लाखो आकाशगंगांची माहिती देण्यात आली आहे. डार्क मॅटर शास्त्रज्ञांना थेट दिसत नाही. कारण, ते प्रकाश शोषत नाही किंवा सोडून देत नाही. ज्याप्रमाणे आपण हवा पाहू शकत नाही; पण झाडांच्या हालचालीवरून तिचा अंदाज लावतो.
तसेच, शास्त्रज्ञ डार्क मॅटरच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर लक्ष ठेवतात. प्रकाशाचे वाकणे : जेव्हा दूरच्या आकाशगंगांकडून येणारा प्रकाश डार्क मॅटरच्या जवळून जातो, तेव्हा तो वाकतो. यावरूनच डार्क मॅटर कुठे लपलेले आहे, याचा शोध शास्त्रज्ञ लावतात. सोमवारी ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या या नकाशात आकाशगंगांचे नवीन समूह आणि त्यांना जोडणारे डार्क मॅटरचे ‘धागे’ दाखवण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे हाडांचा सांगाडा मानवी शरीराला आकार देतो, तसेच हे डार्क मॅटरचे धागे संपूर्ण ब्रह्मांडाचा ढांचा तयार करतात.
आकडेवारीतून ब्रह्मांड :
5 टक्के : तारे, ग्रह आणि मानव (जे आपण पाहू शकतो).
25 टक्के : डार्क मॅटर (जे आकाशगंगांना एकत्र धरून ठेवते).
70 टक्के : डार्क एनर्जी (एक अज्ञात शक्ती).