Cancer Vaccine | ‘कोव्हिड-१९’ च्या इम्यून मेमरीच्या वापरातून कर्करोगावर नवी लस प्रणाली

भारतीय जीवशास्त्रज्ञाचे यश
Cancer Vaccine |
Cancer Vaccine | ‘कोव्हिड-१९’ च्या इम्यून मेमरीच्या वापरातून कर्करोगावर नवी लस प्रणाली
Published on
Updated on

वॉशिंग्टन : भारतीय जीवशास्त्रज्ञ डॉ. तेज कुमार पारिक आणि त्यांच्या संशोधक टीमने वैद्यकीय क्षेत्रात एक मोठे यश संपादन केले आहे. कोव्हिड-१९ महामारीच्या काळात मानवी शरीरात तयार झालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा (इम्यून मेमरी) वापर करून कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी एक नवी लस तंत्रज्ञानाची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील क्लीव्हलँड युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. तेज पारिक हे या संशोधन पथकाचे महत्त्वाचे घटक असून, त्यांचे हे महत्त्वपूर्ण संशोधन नामांकित विज्ञान मासिक ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

शोधकर्त्यांनी ‘प्रोटेक्सी’ (ProTexy) नावाचा डेंड्रिटिक सेल आधारित कॅन्सर व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कर्करोगाच्या लसींमधील मोठी अडचण म्हणजे त्या ‘सीडी४’ टी-पेशींना पुरेशा प्रमाणात सक्रिय करू शकत नाहीत. ‘प्रोटेक्सी’ तंत्रज्ञान ही उणीव भरून काढते. यामध्ये डेंड्रिटिक पेशींवर कर्करोगाशी संबंधित अँटीजन आणि कोव्हिड-१९ च्या स्पाइक प्रोटीनचे काही भाग एकत्र जोडले जातात. यामुळे कोव्हिड संसर्ग किंवा लसीकरणामुळे आधीपासूनच शरीरात तयार झालेली अँटी-व्हायरल इम्यून मेमरी सक्रिय होते आणि ती ‘सीडी८’ टी-पेशींना कर्करोगाच्या पेशींवर अधिक तीव्रतेने हल्ला करण्यास तयार करते. या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांमध्ये अत्यंत सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत.

मेलेनोमा आणि ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त उंदरांवर प्रयोग केला असता, ट्यूमरची (गाठ) वाढ रोखण्यात पारंपरिक लसींपेक्षा हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी ठरले असून, उंदरांचे आयुष्य वाढले आहे. ‘एंटी-पीडी-१’ आणि ‘वॅक्टोसर्टिब’ या थेरपींसोबत जेव्हा ‘प्रोटेक्सी’चा वापर करण्यात आला, तेव्हा ट्यूमरची वाढ अधिक वेगाने मंदावली. तसेच कोव्हिड लस घेतलेल्या व्यक्तींच्या रक्तपेशींच्या ह्युमनाइज्ड माऊस मॉडेलमध्ये ‘PRAME’ आणि ‘MAGE-A3’ या कर्करोग अँटीजनविरुद्ध अत्यंत मजबूत टी-सेल प्रतिसाद दिसून आला. प्रत्यक्ष उपचारादरम्यान प्रथम अफेरेसिस प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी काढून प्रयोगशाळेत त्यांना ‘डेंड्रिटिक पेशीं’मध्ये रुपांतरित केले जाईल. त्यात कर्करोगाचे अँटीजन आणि SARS-CoV-2 च्या स्पाइक प्रोटीनचे अंश जोडले जातील. ही लस शरीरात पोहोचल्यानंतर ती कोव्हिडमुळे बनलेल्या टी-पेशींची मेमरी सक्रिय करेल आणि या टी-पेशींना कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी प्रेरित करेल. या तंत्रज्ञानाच्या मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी आवश्यक करार आता पूर्ण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news