

लंडन : वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी ठरू शकणारे एक संशोधन लंडनमध्ये समोर आले आहे. लंडनच्या नामांकित ‘किंग्ज कॉलेज ऑफ लंडन’मधील शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून असा एक विशेष पदार्थ तयार केला आहे, जो माणसाची तुटलेली आणि खराब झालेली हाडे पूर्ववत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. विशेष म्हणजे, लोकरीपासून बनवलेल्या पदार्थाने एखाद्या जिवंत प्राण्याच्या हाडांची यशस्वी जुळणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीमध्ये आढळणाऱ्या ‘केराटिन’ नावाच्या प्रोटीनचा वापर करून एक अत्यंत पातळ पडदा तयार केला आहे. हे केराटिन प्रोटीन मानवी केस आणि नखांमध्येही नैसर्गिकरीत्या आढळते. शास्त्रज्ञांनी या प्रोटीनवर प्रक्रिया करून हा पडदा विकसित केला असून, हाडांच्या उपचारात याचा मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत जगभरात मेंढीची अतिरिक्त लोकर ही मोठ्या प्रमाणावर शेतीतील निरुपयोगी कचरा म्हणून फेकून दिली जात असे किंवा नष्ट केली जात असे. मात्र, या नवीन संशोधनामुळे आता या टाकाऊ लोकरीचा वापर थेट वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत उपचारांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या लोकरीला आता सोन्याचे मोल येणार आहे.
शास्त्रज्ञांनी सर्वात आधी प्रयोगशाळेत (लॅब) मानवी हाडांच्या पेशींवर याचे परीक्षण केले. त्यावेळी या पेशी केराटिनच्या पडद्याशी चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्याचे आणि त्यांची वाढ अपेक्षेपेक्षा वेगाने होत असल्याचे दिसून आले. यानंतर शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जिवंत उंदरांवर याची चाचणी घेतली. उंदरांच्या कवटीला पडलेली जी छिद्रे नैसर्गिकरीत्या कधीही भरून येऊ शकत नव्हती, तिथे हा केराटिनचा पडदा लावण्यात आला. काही आठवड्यांच्या अत्यंत सूक्ष्म निरीक्षणानंतर, त्या छिद्रांच्या जागी नैसर्गिकरीत्या नवीन हाड तयार झाल्याचे सकारात्मक चित्र शास्त्रज्ञांना पाहायला मिळाले.
सध्या वैद्यकीय क्षेत्रात हाडांची दुरुस्ती आणि दातांच्या शस्त्रक्रियेमध्ये ‘कोलाजेशन’चा सर्वाधिक वापर केला जातो, जे हाडे जोडण्यासाठी डिंकासारखे काम करते. मात्र, कोलाजेशन हे लवकर तुटू शकते आणि ते तयार करण्याचा खर्चही खूप जास्त असतो. मात्र, या नवीन संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कोलाजेशनच्या तुलनेत केराटिनच्या पडद्यामुळे तयार झालेले नवीन हाड हे अधिक सुव्यवस्थित, मजबूत आणि अगदी हुबेहूब नैसर्गिक हाडासारखे होते. यातील फायबर्स एकमेकांशी अधिक घट्ट आणि चांगल्या प्रकारे जोडलेले आढळले.