

न्यूयॉर्क : वाढत्या वयानुसार कपाळावरून मागे सरकणारी केसांची रेषा आणि मूठभर तुटणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणू शकते. अमेरिकेत नुकतेच टक्कल पडण्याच्या समस्येवर बनवलेल्या एका नवीन औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांचे निकाल समोर आले आहेत, ज्यामुळे जगभरातील डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, या औषधाने केवळ केस गळणेच थांबवले नाही, तर पुरुषांमध्ये नवीन केस उगवण्यातही जबरदस्त यश मिळवले आहे.
कॉस्मो फार्मास्युटिकल्स नावाच्या कंपनीचा दावा आहे की, काही रुग्णांमध्ये या नवीन औषधाने प्लेसिबो म्हणजेच साध्या गोळ्यांच्या तुलनेत 539 टक्क्यांपर्यंत अधिक नवीन केस उगवले आहेत. हा आकडा स्वतःच दर्शवतो की, टक्कल पडण्याच्या उपचारात हे औषध किती शक्तिशाली असू शकते.
पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे मुख्य कारण ‘डीएचटी’ नावाचे हार्मोन आहे. हे हार्मोन हळूहळू केसांच्या मुळांना कमकुवत करून त्यांना पातळ करते, ज्यामुळे केस उगवणे थांबते. सध्या बाजारात मिनोक्सिडिल, फिनास्टराईड किंवा हेअर ट्रान्सप्लांट सारखे उपचार उपलब्ध आहेत; परंतु त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते खूप महागडे देखील असतात. चर्चेत आलेल्या या नवीन औषधाचे नाव ‘क्लॅस्कोटेरॉन 5 पर्सेंट’ (Clascoterone 5%) आहे. हे एक असे द्रावण आहे, जे थेट डोक्याच्या त्वचेवर लावले जाते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या आत न जाता, फक्त डोक्याच्या त्वचेवरच डीएचटी हार्मोनला ब्लॉक करते. यामुळे हे औषध त्याच्या जुन्या पर्यायांपेक्षा अधिक सुरक्षित आणि शरीरासाठी सहन करण्यायोग्य मानले जात आहे.
कारण, त्याचा परिणाम हव्या त्या ठिकाणीच असतो. सुमारे 1,400 ते 1,500 पुरुषांवर केलेल्या दोन मोठ्या चाचण्यांमध्ये या औषधाने उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. पहिल्या चाचणीत क्लॅस्कोटेरॉन वापरणाऱ्या लोकांमध्ये 539 टक्के आणि दुसऱ्या चाचणीत 168 टक्के अधिक नवीन केस उगवलेले दिसून आले. कंपनीचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या टक्कल पडलेल्या अनेक पुरुषांमध्ये केस स्पष्टपणे पुन्हा दिसू लागले आहेत.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, या औषधाचे कोणतेही मोठे दुष्परिणाम समोर आले नाहीत आणि ते पूर्णपणे सुरक्षित आढळले आहे. क्लॅस्कोटेरॉनला यापूर्वीच 2020 मध्ये मुरुमांच्या उपचारासाठी अमेरिकेच्या एफडीएने मंजुरी दिली आहे. आता कंपनी याचा 12 महिन्यांचा सुरक्षितता डेटा पूर्ण करत आहे. पुढील वर्षी अमेरिका आणि युरोपमध्ये हेअर लॉस ट्रीटमेंटसाठी याला अधिकृत मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास गेल्या 30 वर्षांतील टक्कल पडण्यावरील हा पहिला नवीन आणि क्रांतिकारी उपचार असेल, जो 50 वर्षांपर्यंत टक्कल पडलेल्या कोट्यवधी पुरुषांसाठी एक नवी आशा घेऊन येईल.