

वॉशिंग्टन : पुरातन काळापासून अतिउष्ण वातावरणात फक्त सूक्ष्म जीवच जगू शकतात, असा समज होता. परंतु, वैज्ञानिकांनी आता एका अशा नव्या ‘अमिबा’चा शोध लावला आहे, ज्याने जटिल पेशी जगण्याच्या कमाल तापमानाचा नवा विक्रम नोंदवला आहे. हा नवा सूक्ष्मजीव अतिउष्ण वातावरणातही सहज वाढू आणि विकसित होऊ शकतो.
कॅलिफोर्नियातील ‘लासेन व्होल्कॅनिक नॅशनल पार्क’मध्ये आढळलेला हा अमिबा तब्बल १४५ अंश फॅरेनहाईट (६३ अंश सेल्सिअस) तापमानातही स्वतःची वाढ करू शकतो आणि पेशींचे विभाजन करू शकतो. एवढेच नाही, तर १५८ अंश फॅरेनहाईट (७० अंश सेल्सिअस) सारख्या अत्यंत उष्ण वातावरणातही तो काही काळ टिकून राहू शकतो, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात समोर आले आहे. या शोधापूर्वी ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात कोणत्याही जटिल पेशींचे पुनरुत्पादन होऊ शकते, याबद्दल विज्ञानाला माहिती नव्हती. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि न्यूयॉर्कमधील सिरॅक्यूज युनिव्हर्सिटीच्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मायक्रोबायोलॉजिस्ट) बेरिल रॅपापोर्ट म्हणाल्या, ‘मला या निष्कर्षांमुळे खूप मोठा धक्का बसला. आमची प्रयोगशाळेतील उपकरणे (इन्क्युबेटर) योग्यरीत्या कॅलिब्रेट केली आहेत की नाही, हे आम्हाला पुन्हा तपासावे लागले... हा खरोखरच एक आश्चर्यकारक शोध आहे.’
अमिबा हे एकपेशीय जीव असतात, जे आपल्या पेशींच्या द्रवाचा वापर करून स्वतःला पुढे ढकलतात आणि हालचाल करतात. ते ‘युकॅरिओटस्’ (Eukaryotes - दृश्यकेंद्रकी) गटात येतात, म्हणजेच त्यांच्या डीएनए पेशीच्या केंद्रकात सुरक्षित असतो. अमिबा वनस्पती, प्राणी किंवा बुरशी यांपैकी काहीही नसले, तरी ते जीवाणू आणि आर्कियासारख्या केंद्रक नसलेल्या प्राथमिक सूक्ष्मजीवांपेक्षा अधिक जटिल असतात. रॅपापोर्ट यांच्या मते, अमिबा उष्ण गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये राहू शकतात, असे जुन्या संशोधनातून सुचवले गेले होते. परंतु, प्रयोगशाळांमध्ये या उष्णता-प्रेमी जीवांचा खूप कमी अभ्यास झाला होता. याच उद्देशाने रॅपापोर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लासेन व्होल्कॅनिक नॅशनल पार्कमध्ये जाऊन या जीवांचे नमुने गोळा केले आणि अभ्यास केला.