

वॉशिंग्टन : सूर्यमालेतील सर्वात दूर असलेल्या नेपच्यून ग्रहाच्या 16 चंद्रांपैकी एक चंद्र इतर चंद्रांपेक्षा पूर्णपणे वेगळा असून, तो आपल्या संपूर्ण सूर्यमालेच्या निर्मितीचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, असा खुलासा ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ने केला आहे. नेपच्यूनचा हा विशाल चंद्र शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त काळापासून तिथे अस्तित्वात आहे. किंबहुना, हा चंद्र नेपच्यूनच्या सुरुवातीच्या काळातील एकमेव ‘जिवंत साक्षीदार’ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन विश्लेषणानुसार, नेपच्यूनचा तिसरा सर्वात मोठा चंद्र ‘नेरेड’ हा कदाचित सूर्यमालेच्या 4.5 अब्ज वर्षांपूर्वीच्या निर्मितीच्या काळात शिल्लक राहिलेला एकमेव मूळ चंद्र आहे. या नव्या संशोधनाने 1949 मध्ये या चंद्राचा शोध लागल्यापासूनच्या जुन्या गृहीतकांना थेट आव्हान दिले आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांचे असे मत होते की, नेपच्यूनने या 350 किलोमीटर रुंद चंद्राला सूर्यमालेच्या बाहेरील कडेला असलेल्या ‘क्युपर बेल्ट’ या बर्फाळ भागातून आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचून घेतले होते.
कॅलटेकमधील प्लॅनेटरी सायन्सचे संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मॅथ्यू बेल्याकोव्ह यांनी सांगितले की, ‘जेम्स वेब टेलिस्कोपच्या निरीक्षणांमुळे ‘नेरेड’ चंद्रावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बर्फ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या प्रकाश वर्णपटाचे (स्पेक्ट्रम) अचूक स्वरूप समोर आले आहे.‘ते पुढे म्हणाले की, जेम्स वेबने घेतलेल्या वेधांवरून असे दिसून आले आहे की नेरेडची रचना क्यूपर बेल्टमधील इतर खगोलीय वस्तूंपेक्षा कमालीची वेगळी आहे. जेम्स वेब टेलिस्कोप अंतराळात कार्यरत असल्यामुळे, त्याने स्वतः घेतलेल्या क्यूपर बेल्टमधील जगाच्या निरीक्षणांशी नेरेडची थेट तुलना करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले. नेरेडची कक्षा अतिशय लंबगोलाकार आहे. यामुळेच शास्त्रज्ञ आधी असा विचार करत होते की, तो पूर्वी क्यूपर बेल्टमध्ये एका स्थिर कक्षेत फिरत असावा आणि नंतर नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो तिथे खेचला गेला.