

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील सर्व राज्यांना निसर्गाचे वरदानच लाभलेले आहे. तेथील अनेक वास्तूही देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करीत असतात. त्यामध्येच त्रिपुरा राज्याचाही समावेश होतो. त्रिपुरा राज्याच्या जणू हृदयात, रुद्रसागर तलावाच्या मध्यभागी एक अद्भुत आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी वास्तू दिमाखात उभी आहे, जिला ‘नीरमहाल’ किंवा ‘पाण्यावरचा राजवाडा’ म्हणून ओळखले जाते. हा भारतातील सर्वात मोठा आणि पूर्व भारतातील एकमेव पाण्यावरील राजवाडा आहे.
नीरमहालाचा इतिहास त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्याशी जोडलेला आहे. या राजवाड्याचे बांधकाम त्रिपुराचे महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांनी केले होते. ते माणिक्य घराण्याचे शेवटचे प्रभावशाली राजा मानले जातात. या राजवाड्याच्या बांधकामाला 1930 साली सुरुवात झाली आणि ते पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ वर्षे लागली. 1938 मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. महाराजांनी हा राजवाडा आपला उन्हाळी राजवाडा आणि मनोरंजनाचे ठिकाण म्हणून बांधला होता. ते येथे आपल्या परिवारासह वेळ घालवत असत. दुर्दैवाने, राजवाडा पूर्ण झाल्यानंतर महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य यांना त्याचा फार काळ उपभोग घेता आला नाही. 1947 मध्ये त्यांचे निधन झाले.
नीरमहालाची वास्तुकला अत्यंत अद्वितीय असून, ती हिंदू आणि मुघल स्थापत्यशैलीचा एक सुंदर मिलाफ आहे. या राजवाड्याच्या रचनेत मुघलकालीन किल्ल्यांप्रमाणे दिसणारे मनोरे, घुमट आणि छत्र्या दिसतील. त्याचबरोबर, राजवाड्याच्या आतील भागात हिंदू वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. हा राजवाडा लाल वाळूचा दगड आणि संगमरवर वापरून बांधला आहे, ज्यामुळे तो पाण्यावर अत्यंत आकर्षक दिसतो. नीरमहाल प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभागलेला आहे :
अंदरमहाल (पश्चिमी भाग) : हा भाग शाही परिवाराच्या खासगी वापरासाठी होता. यात राहण्याच्या खोल्या, मोठे अंगण आणि सुंदर बाल्कनी आहेत, जिथून तलावाचे विहंगम द़ृश्य दिसते.
खुले नाट्यगृह (पूर्व भाग) : हा भाग सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आणि मनोरंजनासाठी होता. येथे एक खुले नाट्यगृह आहे, जिथे संगीत, नृत्य आणि नाटकांचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात येथे ‘नीरमहाल जल उत्सव’ नावाचा एक मोठा सण साजरा केला जातो. या उत्सवात तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नौका शर्यती आयोजित केल्या जातात. हा उत्सव पर्यटकांना आकर्षित करतो आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवतो.