

रियाध : सुमारे ५५ हजार वर्षांपूर्वी निअँडरथल मानव अरेबियन द्वीपकल्पामधील अतिशय खडतर आणि विस्तृत वाळवंटी भागात खोलवर पोहोचले असावेत, असा दावा एका नव्या संशोधनातून करण्यात आला आहे. वैज्ञानिक नियतकालिक ‘क्वार्टरनरी सायन्स रिव्ह्यूज’मध्ये १२ ऑगस्ट रोजी हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या निष्कर्षांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी अधिक पुराव्यांची गरज असली, तरी निअँडरथल मानवाचा अधिवास आतापर्यंत मानल्या गेलेल्या प्रदेशांपेक्षा अधिक दक्षिणेकडे होता, असा महत्त्वपूर्ण संकेत यातून मिळतो.
‘आमच्या या शोधामुळे निअँडरथल मानवाचा वावर पूर्वी माहिती असलेल्या सीमांपेक्षा खूप दक्षिणेकडे आणि अरेबियच्या खुल्या पर्यावरणात असल्याचे स्पष्ट होते,’ असे या अभ्यासाचे सहलेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ माल्टा येथील पुरातत्त्वशास्त्रज्ञ ह्यूब ग्रॉकट यांनी म्हटले आहे. हे संशोधन सौदी अरेबियातील नेफूड वाळवंटातील जुब्बाह शहराजवळ असलेल्या ‘जेबेल कातेफे-१’ या प्राचीन तलावाकाठच्या पुरातत्त्वीय स्थळावर सापडलेल्या दगडी हत्यारांवर आधारित आहे. अरेबियामध्ये आतापर्यंत निअँडरथल मानवाचे कोणतेही सांगाडे किंवा हाडे सापडलेली नाहीत. त्यामुळे या भागातील दगडी हत्यारे नक्की कोणी बनवली, असा प्रश्न संशोधकांना पडला होता.
नवीन अभ्यासानुसार, याठिकाणी सापडलेली हत्यारे आधुनिक मानव म्हणजेच ‘होमो सॅपियन्स’च्या तुलनेत निअँडरथल मानवांच्या निर्मितीशैलीशी अधिक जुळणारी आहेत. प्रामुख्याने युरोपमधील थंड हवामानाशी जुळवून घेणारा मानव अशी निअँडरथलची पारंपरिक ओळख आहे. मात्र, सैबेरिया आणि मध्य पूर्वेतील संशोधनातून ही धारणा आधीच बदलली आहे. हाडे किंवा डीएनए पुरावे उपलब्ध नसल्याने, ग्रॉकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडांच्या छिलाप्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांवरून निअँडरथल हत्यारांची ओळख पटवली. संशोधकांनी जेकेएफ-१ सह अरेबिया, लेव्हंट आणि ईशान्य आफ्रिकेतील विविध ठिकाणांहून गोळा केलेल्या शेकडो टोकदार हत्यारांच्या आकारांचे सांख्यिकी पद्धतींद्वारे तुलनात्मक विश्लेषण केले. यासाठी त्यांनी एका सांख्यिकी मॉडेलची मदत घेतली.