

वॉशिंग्टन : हजारो वर्षांपूर्वी जेव्हा निएंडरथल आणि आधुनिक मानव (होमो सेपियन्स) एकमेकांच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्यातील शरीरसंबंधांबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. एका नवीन जनुकीय संशोधनानुसार, त्या काळात ‘निएंडरथल पुरुष आणि मानवी स्त्री’ यांच्यातील जोडीला अधिक पसंती दिली जात होती. ‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात गुरुवारी हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून शास्त्रज्ञांना एका प्रश्नाने सतावून सोडले होते : मानवी जनुकांमध्ये (जीनोम) निएंडरथलची जनुके इतकी कमी का आहेत? विशेषतः आपल्या ‘एक्स’ क्रोमोझोममध्ये (गुणसूत्र) निएंडरथलचा अंश अत्यंत नगण्य आहे. या भागाला शास्त्रज्ञ ‘निएंडरथल डेझर्ट’ (वाळवंट) असे म्हणतात. यापूर्वी असे मानले जात होते की, निएंडरथलची जनुके मानवांसाठी ‘विषारी’ किंवा हानिकारक असावीत, ज्यामुळे नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत ती नष्ट झाली. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाचे जनुकीय शास्त्रज्ञ अलेक्झांडर प्लॅट यांनी हा तर्क खोडून काढला आहे.
संशोधकांच्या मते, जनुकांमधील हा फरक जैविक समस्येमुळे नाही, तर ‘जोडीदाराच्या निवडीमुळे’ निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे मोर आपल्या जोडीदाराची निवड विशिष्ट वैशिष्ट्यांनुसार करतो, तसेच प्राचीन मानवांनीही केले असावे. संशोधकांनी आफ्रिकेतील तीन प्राचीन लोकसमूहांच्या 73 महिलांच्या जनुकांचा अभ्यास केला. त्यांना असे आढळले की, मानवी ‘एक्स’ क्रोमोझोममध्ये निएंडरथलचे अंश नसले, तरी निएंडरथलच्या ‘एक्स’ क्रोमोझोममध्ये मात्र आधुनिक मानवाचे अंश मोठ्या प्रमाणात आहेत.
आजही आफ्रिकेबाहेरील लोकांमध्ये सरासरी 2 टक्के निएंडरथल डीएनए आढळतो, तर काही आफ्रिकन समूहांमध्ये हे प्रमाण 1.5 टक्क्यांपर्यंत आहे. ‘अनेक वर्षे आम्हाला वाटले की, निएंडरथल जनुके आरोग्यासाठी घातक असल्यामुळे ती पुसली गेली; पण आता असे दिसते की, ही केवळ त्या काळातील जोडीदारांच्या आवडीनिवडीची फलश्रुती आहे,’ असे अलेक्झांडर प्लॅट यांनी स्पष्ट केले. हे संशोधन मानवी उत्क्रांतीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानले जात असून, यामुळे आपल्या पूर्वजांच्या सामाजिक आणि वर्तणूक पद्धतींवर नवा प्रकाश पडला आहे.