Neanderthal genetic | निअँडरथल जनुकांमुळे स्किझोफ्रेनियाचा धोका कमी

Neanderthal genetic |
Neanderthal genetic | निअँडरथल जनुकांमुळे स्किझोफ्रेनियाचा धोका कमी
Published on: 
Updated on: 

लंडन : निअँडरथल मानवाकडून वारशाने मिळालेल्या एका नव्याने आढळलेल्या जनुकीय प्रकारामुळे आधुनिक मानवाच्या मेंदूचा एक भाग किंचित आकुंचन पावत असला, तरी त्याचा बौद्धिक क्षमतेवर कोणताही लक्षणीय परिणाम होत नसल्याचे आणि त्यामुळे स्किझोफ्रेनियाचा धोकाही कमी होऊ शकत असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

‘‘निअँडरथल मानव आणि आधुनिक मानव यांच्यातील जनुकीय फरक आजही आपल्या मेंदूवर परिणाम करतात,’’ असे या अभ्यासाचे सहलेखक तथा जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी ॲन्थ्रॉपॉलॉजी येथील उत्क्रांतीवादी जनुकशास्त्रज्ञ ह्युगो झेबर्ग यांनी सांगितले. झेबर्ग आणि त्यांचे सहकारी स्वँते पाबो यांनी आपले निष्कर्ष १६ नोव्हेंबर रोजी ‘पीएनएएस’ या नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत.सुमारे ४०,००० वर्षांपूर्वी नामशेष होण्यापूर्वी निअँडरथल हे आधुनिक मानवाच्या सर्वांत जवळच्या पूर्वजांपैकी एक होते. एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या संशोधनातून निअँडरथल आणि आधुनिक मानवांमध्ये पूर्वी संकर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज आफ्रिकेच्या उप-सहारा प्रदेशाबाहेरील वंशाच्या बहुतांश लोकांमध्ये सुमारे २ टक्के निअँडरथल जनुकीय वारसा आढळतो. निअँडरथल मानवांची कवटी आधुनिक मानवाच्या तुलनेत मोठी आणि अधिक लांबट होती. या फरकामागील एक कारण म्हणजे मेंदूच्या चार भागांपैकी सर्वांत लहान असलेला आणि कवटीच्या मागील बाजूस असलेला ‘ऑक्सिपिटल लोब’ होय. या भागात डोळ्यांकडून येणारे संकेत प्रक्रिया करणारे दृश्य केंद्र असते. आधुनिक मानवाच्या तुलनेत निअँडरथलमध्ये हा भाग तुलनेने मोठा होता. या नवीन अभ्यासात संशोधकांनी आधुनिक मानवाच्या जनुकसमूहाचे विश्लेषण करून ऑक्सिपिटल लोबच्या आकाराशी संबंधित आणि निअँडरथलकडून वारशाने मिळालेल्या जनुकीय प्रकारांचा शोध घेतला.

यातून त्यांना ‘DAAM1’ या जनुकाशी संबंधित असा एक जनुकीय प्रकार सापडला, ज्याचा संबंध २०१९ च्या एका अभ्यासाने मेंदूच्या विकासाशी जोडला होता. हा जनुकीय प्रकार केवळ आफ्रिकेबाहेरील आधुनिक मानवांमध्ये आढळला असून, पाच निअँडरथल जनुकसमूहांमध्येही तो दिसून आला. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञांनी आधुनिक मानवाच्या जनुकसमूहात शोधलेल्या या निअँडरथल जनुकीय प्रकारामुळे प्रत्येक प्रतीमागे व्यक्तीच्या ऑक्सिपिटल लोबच्या आकारमानात सुमारे ०.०५ घन इंच (०.८५ घन सेंटिमीटर) घट झाल्याचे दिसून आले. याचा अर्थ आधुनिक मानवांमध्ये हे निअँडरथल जनुक मेंदूच्या काहीशा लहान आकारमानाशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.